News Flash

विजेची सर्वाधिक मागणी वसईत

उपकेंद्र रखडल्यास दोन वर्षांत वीजव्यवस्था कोलमडण्याची भीती

(संग्रहित छायाचित्र)

सुहास बिऱ्हाडे

वसई-विरार शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा ताण वीज व्यवस्थेवर पडू लागला आहे. राज्यात विजेची सर्वाधिक मागणी वसई विभागातून होत आहे. वसईत केवळ दोन उपकेंद्रे आहेत. जर वसईला अतिरिक्त उपकेंद्रे मंजूर न झाल्यास वसईची वीजव्यवस्था येत्या दोन वर्षांत कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्याचा परिणाम नागरी सोयीसुविधांवर पडत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे वीजग्राहकांची संख्याही कमालीची वाढत आहे. महाराष्ट्रात महावितरणाचे एकूण ९ विभाग आहेत. वसई विरार शहराचा समावेश कल्याण झोन विभागामध्ये होतो. वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पूर्व आणि पश्चिम आणि वाडा यांचा समावेश आहे. तर नालासोपारा उपविभागात विरार, नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळे यांचा समावेश आहे. वसई विभाग हा कल्याण परिमंडळाच्या अखत्यारीत येतो. वसई विरार शहरात सध्या ८ लाख ५४ हजार वीजग्राहक आहेत. त्यात सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षांत वसईत ८० हजार नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.

वसईत दरमहा २६५ मिलेनियम युनिट म्हणजेच २६ कोटी युनिट विजेची गरज आहे. सध्या नालासोपाराच्या धानीव येथे आणि वसई येथे दोन सबस्टेशन आहेत. मात्र वाढत्या विजेच्या मागणीमुळे आणखी दोन उपकेंद्राची गरज आहे. विरारच्या चिखलडोंगरी आणि कामण येथे प्रत्येकी आठ एकर जागेवर दोन उपकेंद्रे प्रस्तावित आहेत.

चिखलडोंगरी येथील उपकेंद्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ते झाल्यानंतर ८०० मेगावॉट वीज वसईला मिळू शकणार आहे. धानीव येथे शंभर युनिटचे केंद्र अयशस्वी ठरल्याने तेथून सध्या ५० युनिट वीज मिळत आहे. त्यामुळे तेथे पुन्हा शंभर युनिटचे केंद्र नव्याने स्थापित करण्याची गरज आहे. राज्यात सर्वाधिक विजेची मागणी वसई विभागात आहेत. वीज मागणीचा वार्षिक दर हा २० टक्के आहे. त्यामुळे ओव्हरलोडिंगची समस्या भेडसावत आहेत. जर वसईत दोन अतिरिक्त उपकेंद्रे तयार झाली नाहीत, तर पुढील दोन वर्षांत वसईत भीषण वीजस्थिती निर्माण होऊन वीजव्यवस्था कोलमडण्याची भीती महावितरणने व्यक्त केली आहे.

वसई विभागात विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. विजेसाठी उपकेंद्राची गरज आहे. आम्ही शासनाकडे अतिरिक्त विजेसाठी पाठपुरावा करत आहोत. दोन उपकेंद्रे मंजूर झाली तर वीज समस्येवर तोडगा निघेल.

-दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता, वसई विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 12:25 am

Web Title: highest demand for electricity is vasai abn 97
Next Stories
1 खंडणीचा आरोप बिचुकलेंनी फेटाळला
2 आपली जनता मुकी बहिरी नाही – उद्धव ठाकरे
3 मुंबईतील बैठकीत लोकायुक्त मसुद्याला अंतिम स्वरुप : अण्णा हजारे
Just Now!
X