गणरायाबरोबर मुक्कामाला आलेल्या पावसाचा जोर आता शनिवापर्यंत राहणार असून त्यानंतर मात्र तो कमी होणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. गेल्या तीस वर्षांत प्रथमच ऑगस्टमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला असून त्यामुळे धरणे तर भरली आहेतच पण लाभक्षेत्रातील सरासरीही गाठली जाईल.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी ९० मिलिमीटर पाऊस पडतो. मागील वर्षी जुन-जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात २७८ मिलिमीटर पाऊस झाला होता. पण यंदा जून व जुलै कोरडा गेल्याने दुष्काळाचे सावट होते. मात्र यावर्षी ऑगस्टमध्ये पावसाने विक्रम केला. एकाच महिन्यात जिल्ह्यात सरासरी १८५ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे पावसाची सरासरी भरून निघाली. मागील आठवडय़ात पावसाला अनुकूल असे वातावरण होते. तापमान २६ ते ३२.२ अंश सेल्सीअस  होते. आद्र्रता ९२ ते ९४ होती. वाऱ्याचा वेग ताशी ०.५ ते १.८ किमी होता. आता शनिवापर्यंत आकाश ढगाळ राहणार असून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. मात्र शनिवारनंतर पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जिल्ह्यात तापमानात एक ते दोन अंशाने घट होणार असून वाऱ्याचा वेग ११ ते १५ किमी असेल. हवेतील आद्र्रता ६९ ते ७८ राहील. किमान तापमान २० ते २१ व कमाल तापमान २८ ते २९ अंश राहिल असे अंदाजात म्हटले आहे.
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये तीस वर्षांनंतर विक्रमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात हलक्या सरी पडतात. पण यंदा मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा, मुळा व निळवंडे धरणातील पाणीपातळी वाढली असून नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. यंदा मुळा धरणही भरण्याची चिन्हे आहेत. धरणातील पाणीसाठा हा २२ हजार दशलक्ष घनफुटाच्या पुढे गेला आहे. धरणात पाण्याची आवकही चांगली होत आहे. भंडारदरा धरण भरून वहात असून निळवंडेही भरल्यात जमा आहे. गोदावरी नदी वहात असून जायकवाडीतील पाणीसाठा २५ टक्क्य़ांच्या पुढे गेला आहे. जायकवाडी ३३ टक्के भरले तर नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागणार नाही. पावसाचा जोर टिकून राहिला तर महिनाभरात अपेक्षित पाणीसाठा जायकवाडीत होईल.