महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २७८६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता १ लाख १० हजार ७४४ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ५६ हजार ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ४ हजार १२८ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मागील चोवीस तासात राज्यात ५ हजार ७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ५६ हजार ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ५० हजार ५४४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ५०.६१ टक्के इतके झाले आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.७० टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ८९ हजार लोक होम क्वारंटाइन आहे. २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मागील चोवीस तासांमध्ये ज्या १७८ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात १२२ पुरुष तर ५६ महिला होत्या. यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ९१ रुग्ण होते. तर ७४ रुग्ण ४० ते ५९ या वयोगटातले होते. १३ रुग्ण ४० वर्षांखाली होते. १७८ पैकी ४१ जणांच्या आजाराची माहिती मिळू शकलेली नाही. उर्वरित १३७ जणांपैकी ९५ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे जोखमीचे आजार होते. कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या आता ४ हजार १२८ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरित मृत्यू हे यापूर्वीच्या कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.