मेक इन इंडीया, स्टँण्ड अप इंडीया च्या माध्यामातून रोजगार निर्मितीची दावे केले जात असले तरी वास्तवात किती रोजगार निर्मिती झाली हा संशोधनाचा विषय आहे. याचे भिषण वास्तव अलिबाग येथे नुकत्याच पारपडलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शिपाई पदासाठी सुरु असलेल्या भरतीच्या निमित्याने पहायला मिळाले. उच्च शिक्षित तरुणही शिपाई पदासाठी राज्यातील विवीध भागातून रोजगाराच्या अपेक्षेने फिरत असल्याचे यावेळी दिसून आले. रायगडसाठी ४० शिपाई पदाची जाहिरात बँक ऑफ इंडियाने २०१४ रोजी दिली होती. ३ वर्ष उलटून गेल्यानंतर रायगड मधील शिपाई पदाची तोंडी परीक्षा ३ आठवडयापासून सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात ही शिपाई पदाची तोंडी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेला देशाच्या कानाकोपरयातून ४० जगासाठी ४ हजार बेरोजगार तरुणांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे शिपाई पदासाठी पदवीधर, एम. एससी. कम्प्युटर, द्वि पदवीधर झालेले उमेदवार परीक्षेसाठी आलेले होते.

देशातील बेरोजगारी हटविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे दाखवत आहे. मात्र प्रत्यक्षात बेरोजगारी कमी करण्यासाठी शासन पावले उचलताना दिसत नाही आहे. बँक ऑफ इंडियाने २०१४ रोजी शिपाई पदासाठी उमेदवाराचे अर्ज ऑनलाइन मागविले होते. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना शिपाई म्हणून तरी नोकरी लागेल अशी आशा होती. मात्र यासाठीही ३ वर्ष परीक्षेची वाट पहावी लागली. या परीक्षेला महाराष्ट्रातून बेरोजगार तरुण आले होते.

त्याचबरोबर युपी, बिहार, झारखंड, दिल्ली, मध्यप्रदेश अश्या अन्य राज्यातील तरुण परीक्षेसाठी उपस्थित राहिले होते. यातील अनेकांना अलिबाग कुठे आहे हेही माहीत नव्हते असे परीक्षार्थी आले होते. ही परीक्षा 3 आठवड्यापासून सुरू असून टप्याटप्याने उमेदवारांना बोलविण्यात आलेले आहे.

शिपाई पदाच्या परिक्षेसाठी कोणतेही शुल्क बँक ऑफ इंडियाने स्वीकारले नव्हते. मात्र परीक्षार्थीना जाण्या येण्याचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. अनेक उमेदवारांना नवे ठिकाण असल्याने ओळखीचे कोणी नसल्याने एसटी बसस्थानकाचा आधार घ्यावा लागला होता. मात्र बँकेत नोकरी लागेल या आशेने देशातील ४ हजार बेरोजगार तरुण अलिबागेत आले होते.

यातही आता ४० जागांसाठी ४ हजार उमेदवार असल्याने कोणाचा नंबर लागेल व याचा निकाल कधी लागेल हा प्रश्नही परीक्षार्थी समोर उभा ठाकलेला आहेच.    बेरोजगारीचे भिषण वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे.