धवल कुलकर्णी

आपला देश सध्या करोनाच्या संकटाशी झुंज देतो आहे. अशात करोना जिहादसारखा विखारी प्रचार या प्रयत्नांना खिळ घालू पाहतो आहे. मात्र सोलापुरातल्या करमाळ्यात कामगार वर्गाला मदत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लीम बांधव हे जाती-धर्म भेद विसरुन एकत्र आले आहेत. टाळेबंदीमुळे कामगार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. अशा सगळ्यात सोलापुरातल्या करमाळा या ठिकाणी हिंदू मुस्लीम बांधवांनी गरीब कामगारांसाठी जेवण पुरवण्याचे काम करत आहेत.

शिवसेना आणि जय महाराष्ट्र मित्र मंडळाने गरजूंना मोफत अन्न पाकिटे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की शिवभोजनाचा उपक्रम १२ मार्च रोजी म्हणजेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर सुरु करण्यात आला. सुरुवातीला १०० जणांना भोजन वाटप करण्यात येत होतं. आता ही संख्या ५०० पर्यंत गेली आहे.

या उपक्रमासाठी सरकारकडून कुठलेही अनुदान घेतले जात नसून सर्व खर्च कार्यकर्ते व पदाधिकारी आपापल्या खिशातून करत आहेत. चिवटे म्हणाले की या उपक्रमांमध्ये करमाळ्यातील मुस्लिम वस्ती मधील मुस्लिम शिवसैनिक सुद्धा सामील झाले आहेत. ही अन्नाची पाकीट शहरातील मजूर, भिक्षेकरी, रुग्णालयांमध्ये भरती केलेले रुग्ण आणि त्यांच नातेवाईक, पोलीस आरोग्य व नगरपालिकेचे कर्मचारी व निराधार यांना पोचवण्यात येत आहेत. या पाकिटामध्ये तीन पोळ्या, एक सुकी भाजी आणि कोबी फ्लॉवर घातलेला साधारण अडीचशे ग्रॅम मसालेभात यांचा समावेश असतो.

शिवसेनेचे कार्यकर्ते आणि जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे एक सदस्य असलेले अकीब सय्यद यांनी सांगितले की स्वयंपाक करायला साधारणपणे चार महिला आणि एका आचारी आहेत तर पाकिटांचे प्रत्यक्ष वाटपाचे काम सहा ते सात कार्यकर्ते वाहनांतून करतात. विशेष म्हणजे यामध्ये ऊसतोडीसाठी आलेले काही जण यातले मजूर सुद्धा अडकून पडले आहेत. यांनासुद्धा हे अन्न जागेवर नेऊन पोचवले जात आहे.