हर्षद कशाळकर

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

तालुक्यातील १२ दफनभूमींची श्रीसदस्यांकडून स्वच्छता

‘मजहब नही सिखाता, आपस मे बर रखना’ या पंक्तींचा प्रत्यय अलिबागकरांना रविवारी आला. देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू असतानाच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने, रविवारी सर्वधर्मसमभाव आणि मानवतेचा संदेश दिला. प्रतिष्ठानच्या हजारो हिंदू सदस्यांनी तालुक्यातील विविध भागांत मुस्लीम दफनभूमींची स्वच्छता केली आणि  एकात्मतेचे दर्शनही घडवले. अलिबाग शहरासह तालुक्यातील पेझारी, पोयनाड, थळ, मुशेत, रामराज, देवघर, शेखांचे गाव, रेवदंडा, नागाव, श्रीगाव, चौल या गावांमध्ये ही मुस्लीम कब्रस्तान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये अलिबागमधील फारुख सय्यद, अब्दुल सय्यद, रेवदंडा येथील खलील तांडेल, मुजफ्फर सत्तार, नागाव येथील उस्मान शेरखान, हसन खान, शेखांचे गाव येथील अशरफ घोरी, गुलाम कुरेशी, पोयनाड येथील मुराद बुरान, अनवर बुरान, श्रीगाव येथील अनवर ढाले, रऊफ बेलोसकर, पेझारी येथील नूर छापेकर, नदीम बरमारे यांच्यासह अनेक मुस्लीम बांधवांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

या दफनभूमी स्वच्छता अभियानात तालुक्यातील १ हजार ८७२ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते. १२ दफनभूमींमधील एकूण ६० हजार ५१७ चौरस मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला.

वाढलेली झाडेझुडपे काढून एकूण ३४ हजार २८० टन पालापाचोळा, वाढलेले गवत, प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स व इतर कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.