महाराष्ट्रातील मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाला हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शविला आहे. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या अनेक मराठा समाजाच्या संघटनांनी अशाप्रकारच्या आरक्षणाची कोणतीही गरज नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेकडून नाकारण्यात आलेल्या आघाडी सरकारने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजाला आमिष दाखवण्यासाठी आरक्षणाचा निर्णय घेतल्याची टीका शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत केली.