सिंहस्थानिमित्त नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये जमणाऱ्या साधू, महंतांच्या अफाट गर्दीत खरे साधू कोण आणि ‘संधिसाधू’ कोण, असा प्रश्न लाखो भाविकांच्या मनात उपस्थित होणे साहजिक आहे. भाविकांची या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांनी पुढाकार घेतला असून भाविकांना त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सिहंस्थानिमित्त लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याची पर्वणी साधत हिंदुत्ववादी संघटना व संस्थांच्या वतीने विविध माध्यमांतून धर्मजागृती, धर्मप्रसार आणि धर्मशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने १० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत येथे धर्मशिक्षाविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने कुंभमेळ्यात जमणाऱ्या भोंदू साधूंपासून भाविकांनी सावध राहावे म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. खऱ्या साधूंविषयी भाविकांच्या मनात कोणताही किंतू राहू नये, यासाठी खरे साधू आणि भोंदू साधू यांच्यातील फरक पटवून देण्यात येणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे साधक प्रवीण नाईक, अभय वर्तक यांनी दिली.
खरे साधू प्रसिद्धी आणि वादविवादांपासून दूर असतात. हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा निष्ठेने पाळण्यास ते कटिबद्ध असतात. कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांना कुंभमेळ्याचे महत्त्व ते पटवून देतात. त्यांच्याकडून कोणाकडेही काहीही मागितले जात नाही, तसेच ते प्रलोभन दाखवून कोणत्याही वस्तू विकत नाहीत, याविषयी भाविकांना जागृत केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काळाराम मंदिराजवळील निर्माण संकुलात श्री आनंद आखाडय़ाचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता उद्घाटन होणाऱ्या या प्रदर्शनास पालकमंत्री गिरीश महाजन, आ. बाळासाहेब सानप, पंचमुखी हनुमान मंदिराचे श्री भक्तिचरणदास महाराज आणि सनातन संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रसारसेविका स्वाती खाडय़े यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रदर्शनात आचारधर्म, धार्मिक कृती, देवतांची उपासना, बालसंस्कार, आयुर्वेद आदी विषयांवरील ग्रंथ, कुंभमेळा आणि गोदावरीचे महत्त्व गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्याविषयी प्रबोधन, साधू व संत यांचे महत्त्व, मंदिराचे रक्षण, गोरक्षण, गंगारक्षण, धर्मातर, लव्ह जिहाद यांविषयी जागृती करणारे फलक राहणार आहेत.

कुंभमेळ्यात भोंदू साधूही मोठय़ा प्रमाणावर उपस्थित राहत असल्याने अशा साधूंपासून भाविकांनी सावध राहावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार असून यानिमित्त आयोजित प्रदर्शनात त्यासंदर्भातील साहित्यही ठेवले जाणार आहे.
– प्रवीण नाईक ,
साधक, सनातन संस्था

‘आप’च्या आमदार दगडफेकीत जखमी

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या आमदार अल्का लांबा यांच्यावर रविवारी सकाळी उत्तर दिल्लीतील काश्मिरी गेट येथे अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असून त्यात त्या जखमी झाल्या आहेत. अमली पदार्थविरोधी कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या असताना त्यांच्यावर हल्ला झाला असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. सकाळी सहा वाजता त्या स्थानिक लोकांमध्ये जनजागृतीसाठी जात असताना एकाने त्यांना दगड मारला. काहींनी भाजप नेत्याचा हल्ल्यात हात असल्याचे म्हटले
आहे.