‘साईबाबा हे मुस्लीम होते. ते संत किंवा देव नव्हते. हिंदूंनी त्यांची पूजा करू नये’, असे आवाहन करणारे द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना मानणारी हिंदुत्ववादी संघटनांची मंडळी आणि राजकीय पक्ष नागपूरच्या साई मंदिर व्यवस्थापन मंडळावर ताबा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. ज्या साईबाबांना देवपणच द्यायला जी मंडळी तयार नाही, त्यांचे भक्त म्हणून मंदिर ताब्यात घेण्यामागे त्यांचा उद्देश केवळ तेथील संपत्तीच असू शकतो, अशा प्रतिक्रिया या संदर्भात साईभक्तांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे काही हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपची यामधील सक्रियता सर्वाचे लक्ष वेधून घेणारी आहे. त्यांच्यासोबतच काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सक्रिय झाली आहे. जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून मंदिर व्यवस्थापनावर ताबा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटना संपूर्ण ताकदीने नोंदणीत उतरलेल्या असताना त्यांचे श्रद्धास्थान व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबांबद्दल व्यक्त केलेले मत महत्त्वाचे ठरते. ‘साईबाबा हे मुस्लीम होते. ते संत किंवा देव नव्हते. हिंदूंनी त्यांची पूजा करू नये’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता हीच मंडळी स्वत:ला साईभक्त म्हणवत येथील मंदिराच्या व्यवस्थापनावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र सदस्य नोंदणीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.