News Flash

‘एनआरसी’ हिंदुंच्याही मुळावर घाव घालणारा कायदा – उद्धव ठाकरे

"एनआरसीमुळं सर्वच धर्मांतील लोकांना त्रास होईल. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा कायदा आहे."

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) हा कायदा केवळ मुसलमानांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे जर भाजपानं हा कायदा अंमलात आणायचा ठरवलं तर त्यामध्ये केवळ मुसलमानच नाही तर हिंदूही भरडले जातील. सर्वच धर्मांतील लोकांना याचा त्रास होईल. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा कायदा आहे. मी मुख्यमंत्री असलो आणि नसलो तरी माझं धोरणं स्वच्छ आहे की मी एनआरसी होऊ देणार नाही. मी कोणालाही कोणाचा अधिकार हिसकावून घेऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सामना वृत्तपत्रासाठी दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. उलट एक कायदा असा आहे ज्याची चर्चा होणार नाही किंबहुना होत नाही. तो म्हणजे एनआरसी. हा कायदा केवळ मुसलमानांपुरता नाही. जर हा कायदा भाजपानं अंमलात आणायचं ठरवलं तर त्याचा केवळ मुसलमानांना त्रास होणार नाही तर तुम्हा-आम्हाला हिंदूंनाही पर्यायानं सर्व धर्मांना त्रास होणार आहे. यामुळं धर्मनिरपेक्षतेवर घाला घातला जाणार आहे. केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर हिंदुंच्याही मुळावर येणारा हा कायदा आहे. आसामपुरता हा महत्वाचा कायदा आहे. पण संपूर्ण देशात तो येऊ नये. आसाममध्ये १९ लाख लोकांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करता आलेलं नाही. त्यातील १४ लाख लोक हे हिंदू आहेत. तिथल्या आमदार-खासदारांचे ते नातेवाईक आहेत.”

…तर आदिवासी देखील रस्त्यावर येतील

बांगलादेशी आणि घुसखोरांना हाकलावंच लागेल ही बाळासाहेबांची भुमिका आहे, ती काय शिवसेनेची नवी भुमिका नाही. मात्र, काही टक्के घुसखोरांसाठी तुम्ही सर्व देशातील लोकांना रांगेत उभं करता आहात. हे नोटाबंदी सारखचं झालं. यामुळे तुमच्या-आमच्या नातेवाईकांना रांगेत उभं रहावं लागेल. या कायद्यामुळं आदिवासींचं काय होणार? जेव्हा त्यांना हे कळेल तेव्हा ते प्रचंड संख्येने रस्त्यावर येतील. ज्यांच्याकडे जन्माचे दाखले नसतील त्या सर्वाधिक हिंदूंना या कायद्याचा त्रास होईल. एनआरसीचा कायदा लागू करण्याचा विषय अजून तरी देशासमोर आलेला नाही त्यामुळे आत्ताच त्याच्याविरोधात आणि समर्थनार्थही मोर्चे काढण्यातही अर्थ नाही, अशा शब्दांत ‘मनसे’सह इतर सर्वच संघटनांना मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला.

आणखी वाचा – महाविकास आघाडीचं भविष्य काय? उद्धव ठाकरे म्हणतात…

नागरिकत्व दिलेल्यांचं पुनर्वसन कसं करणार हे सरकारनं स्पष्ट करावं

सीएएमुळे बाहेरच्या पीडित अल्पसंख्यांकांना नागरिकत्व दिल्यानंतर त्यांना तुम्ही घरं कुठे देणार? त्यांच्या रोजीरोटीचं काय करणार? देशात आल्यानंतर हे लोक गावांमध्ये नाही तर मोठ्या शहरांमध्येच स्थायिक होणार. त्यामुळे इथल्या शहरांवर आणि सुविधांवर ताण येणार. या लोकांना तुम्ही काश्मीरमध्ये घरं बांधून देणार का? त्यांच्या पुनर्वसनाचं तुम्ही काय करणार हे केंद्र सरकारनं जनतेसमोर स्पष्ट करायला हवं.

एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही

“एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही. त्यांना फक्त असं दाखवायचंय की आम्ही घुसखोरांना काढू इच्छितो पण हे आम्हाला काढू देत नाहीत. म्हणजे ते देशद्रोही आहेत. असं म्हटलं की त्यांच काम झालं. निवडणुकांसाठी त्यांना हेच लागतं. पण आता एनआरसीचा अर्थ हळूहळू लोकांना कळायला लागला आहे. तसेच इतर राज्यांप्रमाणे ‘सीएए’विरोधात ठराव करण्याची गरजच नाही. कारण त्यामुळे देशातून कोणालाही बाहेर काढलं जाणार नाही. यासंदर्भात येणाऱ्या लोकांच्या घरांचा प्रश्न केंद्रानं सोडवला पाहिजे तसं त्यांनी देशाला आश्वासन द्यायला हवं.” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा – शरद पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल नाही – उद्धव ठाकरे

त्यामुळे मी भाजपापासून फारकत घेतली – उद्धव ठाकरे

“धर्माचा उपयोग होळी पेटवून सत्ता मिळवणं असेल तर हे माझं उद्दीष्ट नाही. त्यामुळेच मी त्यांच्यापासून फरकत घेतली. मला हिंदू राष्ट्र पाहिजे पण ते जळणार आणि अशांत हिंदू राष्ट्र अपेक्षित नाही. माझ्या वडिलांनी शिकवलेलं हे हिंदुत्व नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावरही निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 9:18 am

Web Title: hindus will be mobilized in nrc therefore this law will not be implemented says uddhav thackeray aau 85
Next Stories
1 महाविकास आघाडीचं भविष्य काय? उद्धव ठाकरे म्हणतात…
2 शरद पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल नाही – उद्धव ठाकरे
3 आदिवासींच्या पुढय़ातील थाळी हिसकावून नका 
Just Now!
X