हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची सात दिवसांपासून मृत्यूशी सुरू असेलली झुंज अखेर आज अपयशी ठरली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर राजेश अटळ व डॉक्टर दर्शन रेवनवार यांनी कालरात्रीपासून ते तिला मृत घोषित करेपर्यंत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.

केवळ काल रात्रीपासूनच नाहीतर तिची प्रकृती हळुहळु खालावतच होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिचा रक्तदाब वाढवण्यासाठी औषध दिली जात होती. मात्र, तिचा रक्तदाब रोज कमीजास्त होत होता. काल रात्रीपासून तिचा रक्तदाब अत्यंत खालवला होता. औषधांना देखील ती प्रतिसाद देत नव्हती. आज सकाळी तिचं हृदय दोनदा बंद पडलं होतं. एकदा आम्ही ते हृदय पुन्हा सुरू करू शकलो. परंतु दुसऱ्यावेळी मात्र आम्ही ते सुरू करू शकलो नाही. अखेर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी आम्ही तिला मृत घोषित केलं. आम्ही आमच्यापरीने होईल तेवढे सर्व प्रयत्न केले. तिच्या जखमा अतिशय खोल होत्या. अशी माहिती डॉक्टर दर्शन रेवनवार यांनी दिली.

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. यानंतर ऑरेंज सिटी रुग्णालायत आठवडाभरापासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर, आज सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं आहे. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.