वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या उपचारांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दर्शवत आपल्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा परिचय दिला आहे. ‘पीडित तरुणीला किंवा तिच्या कुटुंबीयांना कोणी ओळखत असेल तर कृपया त्यांची माहिती मला द्या,’ असं आवाहन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर केलं आहे.

पीडित कुटुंबाची उपचारासंदर्भात झालेली ससेहोलपट ‘लोकसत्ता’तून निदर्शनास आल्यावर शासकीय यंत्रणा तसेच राजकीय नेत्यांनी मदत करण्याची तत्परता दाखवली. आपल्या ‘ट्विट’मधून आनंद महिंद्रा म्हणतात की, आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना आहे. मी वृत्त वाचून गप्प बसणार नाही. सवरेतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल. जर कुणी पीडितेला किंवा तिच्या कुटुंबीयास ओळखत असेल तर मला कळवा, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. कुटुंबाचे जवळचे स्नेही राजविलास कारेमोरे यांनी उद्योगपती महिंद्रा यांच्या भूमिकेचे स्वागत करीत मदतीची भावना दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

एकतर्फी प्रेमातून विक्की नगराळे या माथेफिरूनं काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथील शिक्षण तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं होतं. पीडित तरुणी कॉलेजच्या दिशेनं जात असताना नगराळे यानं हा हल्ला केला होता. त्यात ही तरुणी बरीच भाजली आहे. या जळीत प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद सातत्याने उमटत आहेत. पीडिता नागपुरात उपचार घेत असून तिची स्थिती अद्याप गंभीरच असल्याचे रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले.

शासनाकडून मदत-
शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत पीडितेला मनोधर्य योजनेअंतर्गत मदत मंजूर करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने ही मदत देण्याचा निर्णय जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या बैठकीत झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेत नागपूरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदतीच्या आर्थिक तरतुदीचे स्वरूप लेखी आदेशात नमूद असल्याचे प्राधिकरणाचे सचिव निशांत परमा यांनी सांगितले. शासन निर्णयानुसार कमाल दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. प्राधिकरणात शासनातर्फे महिला व बालकल्याण अधिकारी नियुक्त असतात. मात्र आजच्या या बैठकीत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार स्वत: उपस्थित झाले होते. पीडितेला अधिकाधिक मदत मिळावी, असा शासनाचा हेतू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शासनाने उपचारासाठी चार लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले असून अकरा लाख रुपयाचा निधीसुद्धा मंजूर झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पीडित कुटुंबीयांची निवास, भोजन आणि वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, तलाठी व पोलीस उपनिरीक्षक यांना मदतीसाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. निर्भया निधीतूनसुद्धा मदत मिळवून देण्याचे प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.