हिंगोली नगरपालिकेने स्वच्छ  सर्वेक्षण अभियानामध्ये देशपातळीवर ३३ वा क्रमांक पटकावला आहे. पालिकेच्या यशस्वी कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरपालिकेला प्रमाणपत्र देऊन मुख्याधिकारी रामदास पाटील व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

नगरपालिकेने गेल्या दोन वर्षांत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भरीव कामगिरी केली आहे. नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक गणेश बांगर यांच्यासह नगरसेवकांनी या अभियानासाठी परिश्रम घेतले. यातून नगरपालिकेने १७ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. शिवाय लोटाबहाद्दरांवर कारवाईदेखील केली आहे. पर्यावरण संतुलनासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड केली. शहर सुशोभीकरणासाठी रस्ता दुभाजकांवर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्यासाठी विविध दुकानांवर छापे टाकून दुकानदारांवर दंडात्मक कारवाईही केली. शहर स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे.

केंद्राच्या पथकाने शहरातील स्वच्छ अभियानाची माहिती घेऊन त्याबाबतचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात ३३ वा क्रमांक मिळाला आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर यांच्या हस्ते पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील, नगराध्यक्षांचे प्रतिनिधी म्हणून गेलेले नगरसेवक गणेश बांगर, अभियंता श्रीमती सनोबर, कर्मचारी बाळू बांगर यांनी पुरस्कार स्वीकारला.

देशात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणार

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हिंगोली पालिकेने ३३ वा क्रमांक मिळविला. मात्र आगामी काळात हिंगोली पालिकेला देशभरात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले.