कळमनुरी पालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या यास्मीनबी शेख फारूक, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मोहमद नजीम रजवी यांची मंगळवारी निवड झाली. िहगोलीत राष्ट्रवादीच्या अनिता सूर्यतळ यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी जगजितराज खुराणा यांची, तर वसमत पालिकेत भाजपचे भगवान कुदळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या शकुंतला इपकलवार यांची निवड झाली. वसमत येथे अध्यक्षपदासाठी मतदान झाले, तर इतरांची बिनविरोध निवड झाली.
िहगोलीत राष्ट्रवादीच्या सूर्यतळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित होती. राष्ट्रवादीत बहुमत असूनही उपाध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस होती. माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे व जगजितराज खुराणा या दोघांनी अर्ज दाखल केले होते. परंतु नियोजित वेळेत लुंगे यांनी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदी सूर्यतळ व उपाध्यक्षपदावर खुराणा यांची बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच शहरात अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली.
कळमनुरी पालिकेत काँग्रेसचे बहुमत असताना अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस होती. अध्यक्षपदासाठी पक्षाच्या यास्मीनबी शेख फारूक, मुक्तारबी हमीदुल्ला पठाण, तसेच शिवसेनेच्या गिरिजाबाई खोडके यांनी अर्ज दाखल केले. पठाण व खोडके यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अध्यक्षपदी फारूक यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून एकमेव मोहम्मद नजीम रजवी यांचा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
वसमत पालिकेत भाजप-शिवसेनेचे बहुमत असून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता होती. अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांनी हक्क सांगितला होता. सेनेच्या दोन सदस्यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजपकडूनही दोघांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, सेनेचे माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या मध्यस्थीअखेर सेनेच्या दोन व भाजपचे शिवदास बोड्डेवार यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या िरगणात भगवान कुदळे व राष्ट्रवादीचे शशिकुमार कुल्थे यांच्यात मतदान झाले. कुदळे यांना १४, तर कुल्थे यांना १२ असे मतदान होऊन कुदळे यांना विजयी घोषित करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठीही मतदान घेण्यात आले. भाजप-सेनेच्या शकुंतला इपकलवार व काँग्रेसच्या गीताबाई गवळे यांच्यात या पदासाठी सरळ लढत झाली. त्यात इपकलवार यांना १४, तर गवळे यांना १२ मतदान झाले.