लोकसभेची निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडावी, यासाठी जिल्हय़ात जादा पोलीस दल तनात केले जाणार आहे. नाशिक, भंडारा व वाशिम येथील पोलिसांची फौज येथे दाखल झाली.
जिल्हय़ात ४६ पोलिसांसह ९५७ जादा कर्मचारी, गोवा राज्य दलाचे पोलीस, राज्य राखीव पोलीस दल यांची प्रत्येकी एक तुकडी बंदोबस्तास तैनात असेल. आत्तापर्यंत सोलापूरहून राज्य राखीव दलाची तुकडी, तसेच वाशिम, अकोला येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी िहगोलीत दाखल झाले. उर्वरित अतिरिक्त बंदोबस्त लवकरच दाखल होईल. िहगोली, वसमत, कळमनुरी विधानसभा क्षेत्रांत हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली.
दरम्यान, मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे. अधीक्षक दाभाडे यांनी दररोज अधिकारी व बीट जमादारांना बिनतारी संदेश यंत्रणेवरून सूचना देण्यास सुरुवात केली आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जादा पोलीस कर्मचारी तनात असणार असून, आवश्यक तेथे राज्य राखीव पोलिसांचे जवान पाठविले जाणार आहेत.
मागणी केल्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील पोलीस अधीक्षक, दोन प्रभारी उपअधीक्षक, ३० प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, मुंबई रेल्वे विभागातून ५ निरीक्षक, गोंदियातून उपनिरीक्षक, ५० पोलीस कर्मचारी, भंडारा जिल्ह्यातून २ उपअधीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, अकोला पोलीस प्रशिक्षण विद्यालयातून ५ निरीक्षक, १५० पोलीस कर्मचारी व ५ प्रशिक्षक याप्रमाणे ठिकठिकाणांहून पोलीस बंदोबस्तास दाखल झाले आहेत.