19 October 2019

News Flash

हिंगोलीत एक कोटीची रक्कम जप्त

संबंधित रक्कम हाताळणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसल्याने ही रक्कम कळमनुरीच्या उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कळमनुरी उपविभागातील कारवाई

कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाटा येथे स्थिर पथकाने एक कोटी रुपयांची रक्कम सोमवारी सायंकाळी एका वाहनातून ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हिवरा पाटीजवळ  एका वाहनाची पथकातील कर्मचारी सतीश माळोदे, बागूल, रामराव राठोड, पोलीस कर्मचारी बाभळे यांच्या पथकाने तपासणी केली. या वाहनामध्ये दोन पेट्यांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम आढळले. या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना दिली. त्यावरून खेडेकर यांच्यासह तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, बाळापूरचे पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे, उपनिरीक्षक सविता बोधनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी वाहनातील व्यक्तींकडे या रकमेचा तपशील मागितला असता त्यांनी ही रक्कम एका पतसंस्थेची असल्याचे सांगितले.

संबंधित रक्कम हाताळणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसल्याने ही रक्कम कळमनुरीच्या उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सापडलेली रक्कम नांदेड येथून कळमनुरीकडे नेली जात असल्याचे वाहनातील व्यक्तींनी सांगितले आहे. तर ही रक्कम सुंदरलाल सावजी बँकेची असल्याचे सांगण्यात आले. याबाबत चौकशी सुरू असल्याचेही खेडेकर यांनी स्पष्ट केले.

First Published on April 16, 2019 1:18 am

Web Title: hingoli seized one crore worth of money