रमेश पाटील

वाडा शहरालगत जवळपास २५ एकर क्षेत्रामध्ये पसरलेल्या ऐतिहासिक तलावाला जलपर्णीनी विळखा घातला आहे. या तलावात शहरातील सांडपाणी वाहून येत असून नगर पंचायतीचे या तलावाकडे दुर्लक्ष झालेले आहे. या तलावाचे सुशोभीकरण केले तर मोठे पर्यटनस्थळ बनू शकते. मात्र प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाडय़ाच्या या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था झाली आहे.

मराठा साम्राज्यात हा परिसर विलीन झाल्यानंतर या भागातील माहुली व कोहोज या दोन किल्ल्यांकडे येण्या-जाण्यासाठी मध्यवर्ती असलेले वाडा हे गाव त्या वेळी सैन्यांचा तळ बनले होते. त्यांच्या आणि परिसरातील रहिवाशांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जवळपास ४० एकरचा तलाव बांधण्यात आला. कालांतराने या तलावाचा बराचसा भाग बुजवला गेला. त्यानंतर १९७२च्या दुष्काळात ‘गरिबी हटाव’ या योजनेतून या तलावाची आणखीन खोली वाढवून या तलावात मत्स्यव्यवसाय सुरू करण्यात आला.

मोकाट जनावरांना पिण्यासाठी पाणी व मत्सव्यवसाय या पलीकडे या तलावाचा गेली अनेक वर्षे फारसा उपयोग केलाच गेला नाही. वाडा शहरातील सांडपाणी, पावसाळ्यात पूर, पाण्यातून आलेला गाळ यामुळे या तलावाची खोली फारच कमी झाल्याने २००२ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत या तलावाच्या काही भागाची पुन्हा खोली वाढवली. मात्र त्यानंतर आजतागायत या तलावाच्या खोलीबाबत अथवा विकासासाठी कुणीही ढुंकूनही बघितलेले नाही.

३५ हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या वाडा शहरात एकही उद्यान अथवा वयोवृद्धांना फेरफटका मारण्यासारखे ठिकाण नाही. वाडा शहरालगत असलेल्या या भल्यामोठय़ा तलावाचे एक पर्यटनस्थळ बनवले गेले तर येथील नागरिकांसाठी बहुउपयोगी तर होईलच, पण नगर पंचायतीला या तलावाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उत्पनाचे साधन मिळेल. मात्र याकडे येथील लोकप्रतिनिधींनी अथवा प्रशासनाने कधी गांभीर्याने बघितलेले नाही.

सध्या या तलावाचा बराचसा भाग अतिक्रमणाने व्यापला आहे. तलाव परिसरातील रहिवाशांकडून सांडपाणी व केरकचरा तलावात टाकला जात असल्याने पाणी अस्वच्छ झाले आहे.

निधीचे काय झाले?

आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी तीन वर्षांपूर्वी वाडा येथे झालेल्या एका कार्यक्रमात वाडा तलावाच्या शुशोभीकरणासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सुतोवाच केले होते. मात्र आजवर हा निधी उपलब्ध होऊ  शकलेला नाही. या तलावाचे योग्यरीत्या सुशोभीकरण झाले तर निश्चितच येथील रहिवाशांना विविध सुविधा मिळतील आणि वाडय़ाच्या सौंदर्यात भर पडेल, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

या तलावाला पर्यटन स्थळ म्हणून दर्जा देऊन येथे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या तर या ठिकाणी रोजगारनिर्मिती होईल आणि वाडय़ातील रहिवाशांना एक पर्यटनस्थळही मिळेल.

– अनंत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ता, वाडा

वाडा तलावाचे सुशोभीकरण झाल्यास वाडा शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.

– विशाल गायकवाड, ग्रामस्थ वाडा