News Flash

काय आहे भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास?

येथील क्रांतीस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही मानवंदना दिली होती

भीमा-कोरेगाव

पुणे-अहमदनगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाला. वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली सुरु असतानाच पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने कोरेगाव क्रांतीस्तंभाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी येत होते. त्याचवेळी ताण-तणाव निर्माण झाला आणि हिंसाचार सुरु झाला. नक्की हा हिंसाचार का झाला त्यामागील कारणे अद्यापही समोर आलेली नाहीत.

१ जानेवारी २०१८ रोजी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील दोन ते तीन दिवस सणसवाडीत तणावपूर्ण शांतता होती. मात्र, या घटनेचे पडसाद पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले. मात्र राज्यभरामध्ये ज्या घटनेचे पडसाद उमटले त्या भीमा-कोरेगावचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात.

काय आहे कोरेगावचा इतिहास?

पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे काही इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते असेही संदर्भ दिले जातात. तरीही ‘महार रेजिमेंट’ने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केल्याचं सांगितलं जातं. ‘महार रेजिमेंट’ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवल्याने अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर या समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत ‘महार रेजिमेंट’ने इंग्रजांना विजय मिळवून दिला.

कोणी उभारला क्रांतिस्तंभ?

अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.

क्रांतीस्तंभाला डॉ. आंबेडकरांकडूनही मानवंदना

१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात. मागील २०० वर्षांमध्ये जो प्रकार घडला नव्हता तो १ जानेवारी २०१८ ला घडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 9:24 am

Web Title: history of bhima koregaon battle in 1818 scsg 91
Next Stories
1 २०० उमेदवार रिंगणात
2 तारापूर औद्योगिक वसाहतीत प्रदूषणमुक्तीकडे पहिले पाऊल
3 अमित देशमुखांच्या बढतीने लातूरकरांच्या अपेक्षा वाढल्या
Just Now!
X