संकलन आणि खपही घटला ; दूध पावडरचे दर कोसळले

अशोक तुपे

सर्वच मोठय़ा शहरात दुधाचा खप कमी झाला. जागतिक बाजारपेठेत पावडरचे भाव पडले. दुग्धजन्य पदार्थ कोणी खाईना. त्यात करोनाच्या भीतीने कामगार कामावर येईना. त्यामुळे दुधडेअरी चालकांनी दुधाचे दर कमी केले. या साऱ्याचा फटका दुध व्यवसायाला बसला आहे.

संचारबंदी लागू करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका राज्यातीलच नव्हे तर देशातील दूध व्यवसायाला बसला आहे. मध्यप्रदेश ,राजस्थान व उत्तरप्रदेश या राज्यातील अनेक चालकांनी डेअरी बंद केली आहे. दूध पावडर प्रकल्पही बंद करण्यात आले आहेत. जगभर करोनाचा कहर असल्याने दूध पावडरचे दर कोसळले आहेत. त्यामुळे खुल्या बाजारात दूध विकत नसतांना त्याची पावडर बनविताना प्रकल्प चालकामध्ये विक्रीची चिंता असल्याने अनेकांनी डेअरी बंद ठेवण्यास सुरवात केली आहे. पोल्टी उद्योगानंतर आता सर्वात मोठा फटका दुग्ध व्यवसायाला बसू लागला आहे.

निम्मे दूध मोठय़ा शहरांमध्ये

राज्यात सव्वा कोटी लिटर दुधाचे संकलन दररोज होते.त्यापैकी ६० लाख लिटर पिशवीतून दूध विकले जाते. त्यात३० लाख लिटर दुध हे मुंबईत व १२ लाख लिटर दुध हे पुण्यात,नाशिकला ६ लाख लिटर दुध विकले जाते. राज्यातील लहान – मोठय़ा शहरात पिशवीबंद दूध हे विकले जाते. त्याखेरीज मुंबईत पंधरा लाख लिटर सुट्टे दूध विकले जाते. तर २० ते  २५ लाख लिटर दुधाची सुगंधी दूध, ताक ,दही, लस्सी, आईस्क्रीम, श्रीखंड, पनीर, मिठाई आदी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापर केला जातो. पण आता संचारबंदीमुळे मिठाईची दुकाने, हॉटेल, आईस्क्रीम पार्लर,हातगाडय़ा, चहाची दुकाने बंद आहेत.  एकटय़ा मुंबईत १५ लाख लिटर पिशवीबंद दुधाचा खप कमी झाला आहे.

पुणे-मुंबईत खप कमी का झाला ?

मुंबई व पुण्यात सकाळी दूध संकलन होते. मात्र घरोघर दूध वाटप करणाराकडे ओळखपत्र नाही. पिशवीबंद दूध काही लोक घेत नाहीत. करोनाच्या भीतीने काही लोक गावाकडे गेले आहेत. काहींनी भीतीपोटी विक्रीचे काम बंद केले आहे. कुटुंबातील लोक दूध वाटपाला घराबाहेर पडू देत नाहीत. काही उत्तरप्रदेश व बिहारमध्ये घरी निघून गेले आहेत. त्यात घराबाहेर पडणाऱ्या ग्राहकांना पोलीस मारहाण करतात. त्यामुळे दूध खरेदीला ग्राहक बाहेर पडत नाहीत. साहजिकच पिशवीबंद दुधाच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे.

राज्यातील विविध डेअरी प्लँटमधून मुंबईत टँकरने दूध येते.  मोठय़ा १२ डेअरीचे वाशीला सुट्टे दूध पिशवीबंद केले जातात. इग्लु व अमीदेव हे खासगी प्रकल्प असून ते दूध पिशवीबंद करून देतात. सध्या या प्रकल्पात कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे दूध पिशवीबंद करताना अडचणी येत आहेत. इग्लु या कंपनीत चारशे कामगार असून त्यांनी त्यांची कंपनीतच राहण्याची भोजनाची व्यवस्था केली आहे. असे इग्लुचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर पाटील यांनी सांगितले. पण इग्लुप्रमाणे अन्य प्रकल्पाकडे सुविधा नसल्याने त्यांना कामगारांचा प्रश्न भेडसावत आहे.

राज्यात पुणे,नगर, सातारा, सांगली,नगर ,कोल्हापूर,सांगली भागात डेअरी प्रकल्प आहेत. पण गावोगावी रस्ते बंद करण्यात आले आहेत.  त्यामुळे दुधाचे संकलन होऊन दूध जरी डेअरीच्या आत आले तरी त्यावर प्रक्रिया करता येत नाही. जिवाच्या भीतीने कामगारही येत नाहीत. बारामती औद्योगिक वसाहतीत रिअलमिल्कने कामगारांना सर्व आरोग्यासाठी दक्षता घेतली आहे. चारशे कामगार प्रकल्पात असून त्यांना दुप्पट पगार करण्यात आल्याची माहिती संचालक मनोज तुपे यांनी दिली. अनेक डेअरीत कामगार कामावर येत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.

निर्यातही ठप्प

दूध विकत नसल्याने पावडर व बटर तयार केले जाते. पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर हे प्रतिकिलो २५० ते २७५ रुपयांवर गेले होते. पण आता हे दर १५० ते १७५ रुपयांवर आले आहे. चीन,युरोप, आफ्रिका व आखाती देशात पावडर जाते.पण जागतिक बाजारपेठेत दर खाली आले. निर्यात होत नाही. भविष्यात दर काय असतील याचा अंदाज नाही. त्यामुळे पावडर तयार करणेही कमी करण्यात आले आहे.  सरकारी दर हा प्रतिलिटर २५ रुपये असला तर पूर्वी हे दर ३५ रुपये होते.शेतकऱ्यांना हा दिला जाणारा दर आता २० रुपये करण्यात आला आहे. शेतकरी दर काहीही द्या पण संकलन सुरू ठेवा असे सांगत आहेत.

दुधाचे संकलन ,विक्री याला सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. आता विक्रेते, कामगार, टँकरचे चालक या सर्वांना ओळखपत्र व पास देण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व सुरळीत होईल. डेअरी उद्योगात काही अडचणी आल्या तर खास हेल्पलाईन व मोबाईल क्रमांक दिले आहेत. पण अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या तरी संकलन बंद न ठेवता मार्ग काढण्याचे काम सुरू आहे.

– राजेश लेले, संचालक,  प्रभात डेअरी .

अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला असून पावडरला भाव नाही.ती विकली जात नाही. आता कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे प्रक्रिया झाली नसल्याने दहा हजार लिटर दुध नासले. गावातील कामगारांना बाहेर जाऊ दिले जात नाही.  सोनाई डेअरीत दररोज १७ लाख लिटर दुधाचे संकलन होते.अडीच हजार कामगार असून केवळ पाचशे कामगार येत आहेत. प्रक्रिया होत नसल्याने दूध नासु लागले आहे. दर कमी करण्याचे सोडाच पण दूध संकलन करता येणार नाही. दुधाला आता खाडे द्यावे लागेल.

– दशरथ माने, संचालक ,सोनाई दूध, इंदापूर

पिशवीबंद दुधाच्या वितरणाची साखळी बाधित झाली आहे. लोक दुधाचे पदार्थ खरेदी करण्यास घाबरत आहेत.  करोनाच्या भीतीने दूध पिशवी वाटायला मुले येत नाहीत.हॉटेल, हातगाडी, मिठाईची दुकाने बंद झाली आहे. त्यामुळे दुधाचा खप कमी झाला आहे.

– भास्कर पाटील ,वितरण प्रमुख, गोकुळ दूध, मुंबई.

डेअरीच्या बॉयलरसाठी कोळसा लागतो. तो मुबईतील बंदरातुन आणावा लागतो. सध्या मालवाहतूक बंद आहे. त्यामुळे कोळसा मिळत नाही. दूध पावडरचे दर काय असतील हे माहीत नाही. कामगारांना पगार दुप्पट केले.महिन्याला पन्नास लाखाचा भरुदड पडणार आहे.

– मनोज तुपे, संचालक , रियलमिल्क, बारामती.