एजाज हुसेन मुजावर

सोलापूर जिल्ह्य़ात तीन लाखांहून कामगारांच्या रोजीरोटीचा जसा प्रश्न निर्माण झाला आहे, तसा ग्रामीण भागात असंख्य शेतकरी व शेतमजुरांच्या दररोजच्या जगण्याची लढाई खूपच बिकट होत आहे. शेतात पिकून तयार झालेला माल बाजारपेठेत पाठविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे
Liquor stock worth 28 lakh seized Gadchiroli action befor elections
गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

ज्वारीची काढणी व मळणी अंतिम टप्प्यात असताना त्यातही अडचणी निर्माण होत आहेत. कारण करोनाच्या भीतीमुळे मजुरांची वानवा प्रकर्षांने जाणवतेय. मळणी होऊन ज्वारी भरण्यासाठी पोती-पिशव्या उपलब्ध होत नाहीत. त्यात पुन्हा ज्वारी विक्रीसाठी बाजारात आणण्याची व्यवस्था कोलमडली आहे. वाहने मिळत नाहीत. वाहनचालकांनाही कामावर येण्याची मानसिकता नाही. ज्वारीचे कोठार समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढा भागात ज्वारीची काढणी, मळणी आणि विक्री यापूर्वीच झाली आहे. तेथील शेतकरी सध्या तरी निश्चिंत आहे; परंतु उशिरा पेरण्या झालेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आदी भागांत सध्या शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अद्यापि सुमारे ३० हजार एकर क्षेत्रात तयार ज्वारी बाजारात विक्रीसाठी पोहोचली नाही. एकीकडे अवकाळी पावसाची भीती असताना आता करोनाचेही संकट ग्रामीण भागातील अर्थचक्र थांबण्यास भाग पाडत आहे.

बेदाणे उत्पादकांची चिंता

सोलापूर जिल्ह्य़ात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्षांची लागवड होते. यातील काही द्राक्षमाल परदेशी निर्यात होतो. यंदा द्राक्षाला चांगला भाव मिळू लागला असतानाच दोन-तीन वेळा पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त होता. त्यात द्राक्षांचा प्रतिकिलो ६० रुपये ते ७० रुपये मिळणारा दर आता पार खाली जाऊन २० रुपये किलो दराने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्षांपासून बेदाणे तयार केले आहे; परंतु आता त्यात करोना संकटाची भर पडल्यामुळे तयार झालेले बेदाणे बाजारात न्यायचे आणि विकायचे कसे? या चिंतेने शेतकरी व्याकूळ झाला आहे. तासगाव, पंढरपूर भागांत सध्या बेदाण्याला प्रतिकिलो १७५ रुपये ते २०० रुपयांपर्यंत दर मिळू लागला असताना शेतकऱ्यांना पुन्हा संकटाच्या खाईत ढकलले आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी शीतगृहांमध्ये बेदाणे माल ठेवल्यामुळे नवीन बेदाणे ठेवण्यासाठी शीतगृहांची कमतरता पडली आहे.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही माल बाजारात पाठविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हजारो एकर क्षेत्रात डाळिंब पडून आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे. केळी, पपई, कलिंगड आदी फळे शेतात पक्व होऊन बाजारात विक्रीसाठी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ही फळे तोडून बाजारात विक्रीसाठी वेळेत पाठवली जात नसल्यामुळे ती शेतातच खराब होत आहेत.

शेतकऱ्यांची लूट

महानगरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडून इडली-सांबारसाठी मोठी मागणी असलेल्या भोपळ्याची अवस्थाही अडचणीची आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागण्यापूर्वी नवी मुंबईत वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात भोपळ्याला प्रतिकिलो दहा रुपये दर मिळत होता; परंतु आता भोपळे शेतातच पडून खराब होत आहेत. करोनाचे संकट कोसळण्याच्या बेतात असताना सोलापुरातील काही शेतकऱ्यांनी शेकडो टन भोपळा वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारात विक्रीसाठी पाठविला होता; परंतु भोपळा पाठवून देण्यापासून ते प्रत्यक्ष वाशीत पोहोचेपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्टय़ा संकट झेलत राहिला. वाहतूकदार व व्यापाऱ्यांनी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना अक्षरश: कोंडीत पकडून पडेल किमतीत शेतीमाल खरेदी केला. दहा रुपये दराने विकला जाणारा भोपळा अवघ्या तीन रुपये दराने विकावे लागले. यात पुन्हा वाहतूक खर्चाचा हिशेब करता भोपळ्याचा भाव प्रतिकिलो केवळ एक रुपयाच मिळाला. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी गावचे भोपळा उत्पादक शेतकरी रणजित चव्हाण यांनी त्यांचा अनुभव सांगितला.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

करोनामुळे बाजारपेठाच बंद आहेत. यात रासायनिक औषधे, खते, बी-बियाणांची दुकानेही बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऊस, कांदा व अन्य पिकांना वेळच्या वेळी खते द्यावी लागतात. ही कामे थांबली आहेत. दुसरीकडे पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली वीज मिळण्यातही अडचणी येत आहेत.