इगतपुरीतील हितेश निकमने मध्य प्रदेशमधील उज्जन नगरपालिकेच्या वतीने आयोजित स्पर्धेत ‘मिस्टर वेस्टर्न इंडिया’ किताब मिळविला. हितेशला नवीन वर्ष अत्यंत फलदायी ठरत असून या वर्षांत त्याने आतापर्यंत तीन वेगवेगळ्या स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले आहे. उज्जनच्या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, विदर्भ आणि गोवा या सहा राज्यांतील शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन व समारोप मध्य प्रदेशचे उद्योगमंत्री कैलास वरगी, एशियन फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस तसेच इंडियन बॉडीबिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी उज्जनचे महापौर रामेश्वर अखंड, स्पर्धेचे संयोजक सत्यनारायण चौहान, मध्य प्रदेश बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रेमसिंग यादव, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर उपस्थित होते.
स्पर्धेचे गुणलेखक म्हणून राजेंद्र सातपूरकर व नाशिकचे किशोर सरोदे यांनी काम पाहिले.