News Flash

‘तुरट’ आवळ्याने संपन्नतेचा ‘गोडवा’

केवळ दोनशे रुपयांमध्ये उद्योग सुरू करण्याचे धाडस सहजासहजी कुणी करीत नाही. पुसटशी कल्पनाही आधी न केलेला उद्योगाचा, तर कुणी विचारही करू शकत नाही.

| February 14, 2014 01:28 am

केवळ दोनशे रुपयांमध्ये उद्योग सुरू करण्याचे धाडस सहजासहजी कुणी करीत नाही. पुसटशी कल्पनाही आधी न केलेला उद्योगाचा, तर कुणी विचारही करू शकत नाही. मात्र, जालना जिल्ह्य़ासारख्या अवर्षणग्रस्त भागात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करून त्याला राष्ट्रीय पातळीवर पोचविण्याचा यशस्वी प्रयोग गत काही दिवसांपूर्वी झाला आहे. आवळा या तुरट फळावर प्रक्रिया करून त्याचा उद्योग उभारण्याचे अभिनव कार्य रामभाऊ सखाराम मोहिते व सीता मोहिते या दाम्पत्याने केले आहे. त्यांच्या या प्रक्रिया उद्योगाची दखल राष्ट्रीय कृषी वसंत प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्रालयाने स्टॉल देऊन घेतली आहे. त्यांच्या आयुष्यात तुरट आवळ्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे संपन्नतेचा गोडवा निर्माण केला आहे.
शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा असताना अशा गंभीर प्रश्नांची सोडवणूक आवळा प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी केली.
जालना जिल्ह्य़ातील सिंधी काळेगाव हे त्यांचे गाव. अवर्षण त्यांच्या पाचवीलाच पुजलेले. अशा परिस्थितीत शेती नफ्याची करायची म्हणजे दिव्यच. घरची परिस्थिती बेताचीच. केवळ दोन एकर शेती. मोहिते दाम्पत्याने केवळ शेतीच केली नाही, तर आवळ्यावर विविध प्रक्रिया करून पदार्थही बनविले. केवळ दुर्मीळ इच्छेचेच भांडवल करून या दाम्पत्याने हा प्रक्रिया उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. शेतीतून निघालेला आवळा  कमी पडतो म्हणून अन्य शेतकऱ्यांचा आवळा कच्चा माल म्हणूनही त्यांनी घेतला.  
राष्ट्रीय कृषी वसंत प्रदर्शनात केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने देशाची कृषी व संलग्न क्षेत्रांमधील प्रगती टप्प्याटप्प्याने चित्रमय, दृकश्राव्य पद्धतीने दाखविली आहे. या पॅव्हीलीयनमध्ये महाराष्ट्राच्या भोलेश्वर आवळा प्रक्रिया उद्योगाच्या स्टॉलने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर जागा मिळविली आहे. आवळ्यापासून बनविलेले आवळा कँडी, आवळा – गुलाब प्रवाळयुक्त गुलकंद, आवळा सुपारी, आवळा ज्यूस, आवळा लोणचे व आवळा मुरंबा त्यांच्या स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चवीने खुणावत आहे.
अत्यंत आकर्षक पद्धतीने पॅकिंग केलेल्या या पदार्थाना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जालनाच्या या स्टॉलने देशभरातल्या शेतकऱ्यांपुढे कृषी प्रक्रिया उद्योगाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:28 am

Web Title: hogpom bholeswar fruit process industries jalna
Next Stories
1 प्रभाकर देशमुख यांच्या कुटुंबीयांकडील जमिनीचा अकृषक परवाना रद्द
2 मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ
3 भू-विकास बँकोंच्या जीवदानास सर्वपक्षीय समिती अनुत्सुक
Just Now!
X