22 October 2020

News Flash

लॉकडाउनमध्ये सरकट वीजबील पाठवल्याच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी

सुधारणा न केल्यास महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा खासदार रामदास तडस यांचा इशारा

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या तीन महिन्यांच्या काळातील वीजबील सरसटक पाठविल्याच्या निषेधार्थ, खासदार रामदास तडस यांनी आज वर्धा येथे बीज बिलांची होळी केली. तसेच, यामध्ये सुधारणा न केल्यास महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचाही इशारा दिला.

टाळेबंदीच्या काळात वीज बील सरसटक पाठविल्याच्या निषेधार्थ खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात आज महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. टाळेबंदीच्या तीन महिन्याचे भरमसाठ बील आल्याच्या असंख्य तक्रारीची नोंद घेत, हे आंदोलन आज करण्यात आले. विद्युत बिलाची आकारणी करतांना तिन्ही महिन्यांचे एकूण युनिट ग्राह्य धरून सरसकट बील पाठविण्याचा आरोप आहे.

१ एप्रिल २०२० पासून विद्युत नियामक आयोगाने युनिटनुसार दर लागू केले आहे. ० ते १०० युनिटसाठी ३ रूपये ४६ पेसे प्रती युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ७ रूपये ४३ पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी १० रूपये ३२ पैसे, ५०१ ते १००० युनिटसाठी ११ रूपये ७१ पैसे तसेच १ हजार पेक्षा जास्त युनिटसाठी ११ रूपये ७१ पैसे प्रती युनिट दर आहे.

टाळेबंदीच्या काळातील बीलं प्रत्येक महिन्यातील वापराचा अंदाज न घेता, सरसकट तीन महिन्याचा सरासरी अंदाजाने  काढण्यात आले आहे. त्यामुळे आकारणी जास्त होवून नागरिकांना भुर्दड पडत आहे. या विषयाची दखल घेवून त्वरीत सुधारणा न केल्यास महावितरणच्या सर्व कार्यालयांना कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा खासदार तडस यांनी दिला. आंदोलनात पंचायत समिती सभापती महेश आगे, भाजपा नेते मिलींद भेंडे, गिरिष कांबळे, श्रीधर देशमुख, दिनेश वरडकर व अन्य सहभागी झाले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या कालावधीतील तीन महिन्यांचे एकत्रित वीज बील पाठवून महावितरणाने ग्राहकांना धक्का दिला आहे. लॉकडाउनमुळे नागरिक आधीच आर्थिक कोंडीत सापडले असूूून, या अवास्तव वीज बिलामुळे त्यांची झोप उडाली आहे. त्यातच वीज देयकात विविध प्रकारचे भार लावून वीज वितरणाने ग्राहकांनी वीज बील भरावे यासाठी आवाहन केले आहे.

महावितरण आर्थिक संकटात?

लॉकडाउनच्या कालावधीत ग्राहकांचे वीज मीटर रिडींग घेणे बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिट आकारून वीज बील पाठवण्यात आले होते. तसेच वेब पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापरानुसार बिले देण्यात आली होती, असे वीज कंपनी कडून सांगण्यात येत आहे. तर निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात महावितरणचे शहापूर तालुक्यात झालेले ७० लाखाहून अधिक नुकसान आणि ग्राहकांकडे कोट्यवधींची असलेेली थकबाकी यामुळे महावितरण आर्थिक संकटात सापडले असल्याचे सांगून वीज बिल भरण्यासाठी गळ घातली जात आहे.

दरम्यान, एप्रिल, मे, जून महिन्यात स्वतःहून रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना वीज वापरानुसार वीज बिल पाठविण्यात येत आहे. हे वीज बील लॉकडाउनच्या कालावधीसह साधारण तीन महिन्यांचे एकत्रित असल्याने ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र संगणकीय प्रणालीद्वारे वीज बिलाची वापरानुसार तीन महिन्याची विभागणी करून युनिटला दरातील सवलत (स्लॅब बेनिफिट) देण्यात येत आहे, असा दिलासा देऊन ग्राहकांनी थकित वीजबिल भरून महावितरणास सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 8:34 pm

Web Title: holi of electricity bills in wardha msr 87
Next Stories
1 करोनाविरोधात जनप्रबोधन करणाऱ्या तेलुगु गायकाचा करोनामुळेच मृत्यू
2 पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी पतीची चितेवरून विहिरीत उडी मारुन आत्महत्या, चंद्रपुरातील ह्रदयद्रावक घटना
3 चंद्रपूर : शेतकऱ्याच्या घरात शिरलेली वाघीण अखेर जेरबंद
Just Now!
X