भेटी नाही झाली तर गाठी बसणे गरजेचे असते म्हणतात. हॉलंडच्या मिका जाधव यांना भेट दिल्यावर याचाच प्रत्यय येतो. सामाजिक संस्थेच्या मदतीने कुष्ठरोगी महिलेच्या उपचारासाठी आणि घरबांधणीसाठी मदत करणाऱ्या मिका रुक्मिणी नामक त्या महिलेचा शोध घेण्यासाठी चक्क रायगड जिल्ह्य़ातील पोलादपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. गावागावांत जाऊन रुक्मिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.

हॉलंडची मिका जाधव सध्या रायगड जिल्ह्य़ातील पोलादपूर गावात दाखल झाली आहे. सध्या रुक्मिणी नावाच्या महिलेचा शोध ती घेतेय. ही रुक्मिणी पोलादपूरच्या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मिकाने केलेल्या मदतीतूनच रुक्मिणीवर उपचार करण्यात आले. तिला घरदेखील बांधून देण्यात आले होते. यासाठी संबंधित सामाजिक संस्थेने रुक्मिणीचा फोटो मिकाला पाठवण्यात आला होता. तो फोटो पाहिल्यापासून मिकाचे तिच्याशी भावनिक नाते जडले. मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या मिका हिचे तेव्हापासून रुक्मिणीच्या हसतमुख चेहऱ्याशी भावनिक संबंध जोडले गेले होते. आता तिच्या भेटीसाठी आतुर झालेली मिका हजारो किलोमीटरचा प्रवास करून पोलादपुरात आलीय.

मागील आठवडाभरापासून रुक्मिणीच्या शोधासाठी मिका गावोगाव भटकतेय. तिची नजर काही तरी शोधतेय हे पोलादपुरातील काही तरुणांनी ओळखले. त्यांनी तिची चौकशी करून रुक्मिणीच्या शोधासाठी ते तिला मदत करताहेत. केवळ एक फोटो आणि फक्त रुक्मिणी एवढेच नाव माहिती असल्याने अद्याप रुक्मिणीचा शोध लागू शकला नाही.

रुक्मिणी ज्या लेप्रसी मिशन रुग्णालयात उपचार घेत होती ते रुग्णाालय २०१० सालीच बंद झालेय. तिथे कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसल्याने रुक्मिणीचा शोध घेणे अवघड होऊन बसलेय.

३१ मे रोजी मिकाचा वाढदिवस आहे. तो दिवस रुक्मिणीबरोबर घालवायची मिकाची मनोमन इच्छा आहे. जर रुक्मिणीबद्दल कुणाकडे माहिती असल्यास त्यांनी ८०८७०४०९९१ किंवा ९२२६८४९१८५ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन तिने केले आहे.