परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी आपले व्यवहार बंद ठेवून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘बंद’मुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. शिवसेनेच्या वतीने शहर बंदचे आवाहन केले होते.
मुंडे यांच्या निधनाचे वृत्त मंगळवारी सकाळी जिल्हाभरात पसरताच पाथरी, मानवत, ताडकळस, बोरी, गंगाखेड आदी ठिकाणी ‘बंद’ पाळण्यात आला. शिवसेनेने बुधवारी ‘बंद’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील मुख्य बाजारपेठ, तसेच कॉलनीतील दुकाने बंद होती. नव्या मोंढय़ात कापूस खरेदी झाली नाही. मोंढा पूर्णत: बंद होता. स्टेशन रस्ता, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रस्ता, कच्छी मार्केट, वसमत रस्ता, जिंतूर रस्ता आदी भागातील दुकाने बंद होती. ‘बंद’मुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. ‘बंद’मधून वैद्यकीय सेवा व बससेवा वगळली होती.