मनुष्यबळा अभावी गैरसोय; तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पालघर : पालघर शहरात असलेल्या काही गॅस वितरकांकडे घरपोच सेवा देण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने टाळेबंदीच्या काळात नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत होती. त्याचप्रमाणे वितरकांच्या दुकानासमोर लांब रांगा लागत असल्याने करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडरची सेवा देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश पालघरचे तहसीलदार यांनी संबंधितांना दिले आहेत.

करोना संसर्गाच्या भीतीमुळे गॅस वितरण व्यवस्थेतील अनेक कामगार आपल्या मूळ गावी पळाल्याची सबब पुढे करून तसेच गॅस घरपोच न देता घराखालीच गॅस देण्याच्या सूचना असल्याचे सांगत काही नामांकित कंपनीच्या वितरकांनी गॅस घरपोच देण्याऐवजी आपल्या कार्यालय, गोडाऊन किंवा इमारतीखाली नागरिकांना बोलवत असत. परिणामी गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर लांबलचक रांगा लागत असल्याने सामाजिक अंतर राखणे कठीण होत असे. टाळेबंदी सुरूच राहिली तर काही काळाने आपल्याला गॅस सिलेंडर सहजगत्या मिळणार नाही या भीतिपोटी वयोवृद्ध, महिला व नागरिक तासन तास उन्हामध्ये उभे राहून स्वत: गॅस घरी घेऊन जात असत.

नागरिक गॅस सिलेंडर घेण्याच्या सबबीखाली घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्याने पालघर पोलीस यांनी दुचाकीवरून सिलेंडरची वाहतूक करण्यास मज्जाव केला. त्यामुळे अनेक नागरिकांना व महिलांना आपल्या डोक्यावर गॅस सिलेंडर वाहून न्यावे लागले. याबाबत पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी पुरवठा अधिकारी यांच्यासह शहरातील प्रमुख गॅस वितरकांची तातडीची बैठक घेऊन सर्व नागरिकांना त्यांच्या घरी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी संबंधित गॅस वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यासंदर्भात चर्चा केली. शहरातील नागरिकांनी पूर्वीप्रमाणे दूरध्वनीवरून अथवा भ्रमणध्वनीवरून आपल्या गॅसची नोंदणी करावी व कालांतराने आपल्याला आपल्या घरी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात येईल, असे सुनील शिंदे यांनी पालघरच्या नागरिकांना आश्वासित केले आहे.