खासदार संजय राऊत यांचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रतिउत्त

मुंबई : जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी गृहखात्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याने शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याकडे हे खाते सोपवले, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनामधील त्यांच्या रोखठोक सदरातून केला. दरम्यान, राष्ट्रवादीने राऊत यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

राऊत यांनी गृहमंत्री पदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे,दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.  देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. असा टोला राऊत यांनी गृहमंत्री देशमुख यांना लगावला आहे.विरोधी पक्षाला ठाकरे यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे.त्यांचे आरोप सुरुवातीला जोरदार वाटत असले तरी नंतर ते खोटे ठरतात. पण अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळ्यात आधी जावे लागेल. मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटकं प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली. सिंह ते सहन करू शकले नाहीत.त्यात गृहमंत्री देशमुख यांनी ‘पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले’ असे विधान केले. त्यामुळे त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी दिल्याचे पुत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. हे टार्गेट कुणाला दिले, तर मनसुख हिरेन या तरुणाच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंना. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा  चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी? असा सवाल  राऊतांनी केला आहे.

फडणवीसांकडून सीबीआय चौकशीची मागणी हास्यास्पद

रश्मी शुक्ला व सुबोध जयस्वाल या बड्या अधिकाऱ्यांनी पोलीस खात्यातील काही बदल्यांसंदर्भात दलालांचे फोन टॅप केले. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून हे फोन टॅपिंग झाले. पण या संभाषणात ज्या अधिकाऱ्यांची नावे आली त्यातील एकाही अधिकाऱ्यांची बदली संभाषणात ऐकू येते त्याप्रमाणे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे बदल्यांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा! या खोट्या माहितीचा अहवाल घेऊन आपले विरोधी पक्षनेते फडणवीस हे दिल्लीत आले. केंद्रीय गृह सचिवांना भेटले व सीबीआय चौकशीची मागणी केली. हा प्रकार हास्यास्पद आहे, असा निशाणा राऊत यांनी फडणवीसांवर साधला.

आघाडीत मिठाचा खडा टाकू नका – अजित पवार</strong>

अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, असा गौप्यस्फोट करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनिल देशमुख यांनी याबाबत भाष्य करण्याचे टाळले असले तरी नवाब मलिक आणि अजित पवार यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. कोणत्याही नेत्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. ते रविवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.