घरकुलाचे हस्तांतरण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मनाई केल्याने शुक्रवारी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पालिकेच्या वतीने सोडत पद्धतीने लाभार्थ्यांना घरकुल वाटप करण्याचा निर्णय रद्द करावा लागला. मात्र, हा निर्णय रद्द झाल्याने पालिकेत उपस्थित शेकडो लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत ‘घरकुल द्या, नाही तर पसे परत करा’, अशी मागणी करीत पालिकेसमोर ठिय्या दिला.
घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या एक हजार २०६ पकी ३०२ घरकुलांची शुक्रवारी सोडत काढून लाभार्थ्यांना ती हस्तांतरित करण्यात येणार होते. सोडतीची पूर्ण तयारी करण्यात आली होती. योजनेसाठी पात्र शेकडो लाभार्थी उपस्थित होते. मात्र, अचानक औरंगाबाद खंडपीठाने घरकुल हस्तांतरणास मनाई केली असल्याचा संदेश मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त झाला. त्यामुळे मुख्याधिकारी राजेश बुबणे यांनी घरकुल हस्तांतरणाचा कार्यक्रम रद्द केला. या बरोबरच न्यायालयाने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून पालिकेने कोणतीही रक्कम स्वीकारू नये, असे स्पष्ट आदेश पारित केले. अशा प्रकारचे पत्र अॅड. आर. व्ही. नाईकनवरे यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे घरकुल वाटपाचा निर्णय रद्द करावा लागला.
सहासात वष्रे पसे भरूनही घरकुल मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या लाभार्थी पुरुष-महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना भंडावून सोडले. एक तर आम्हाला घरकुल द्या, नाही तर आमचे पसे परत द्या, असा पवित्रा घेत पालिकेत या लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. नगरसेवक संजय बताले, कमलाकर चव्हाण यांनी लाभार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाभार्थी आक्रमक झाले होते.