आनंदी घरासाठी ‘होम लायब्ररी’चा प्रयोग घराघरांत सुरू झाला पाहिजे. त्यातूनच ‘हॅपी होम’ची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पुढाकार घेण्याचे आवाहन माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. कलाम यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य इमारत, विज्ञान भवन, प्रवरा पब्लिक स्कूलची प्राथमिक शाळा अशा विविध इमारतींचे भूमिपूजन व प्रवरा स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील विविध प्रकल्पांचा शुभारंभ डॉ. कलाम यांच्या हस्ते सोमवारी करण्यात झाला. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या ‘उदात्त मनाची जडणघडण’ या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. कलाम बोलत होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब विखे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोकराव पाटील, विश्वस्त आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे या वेळी उपस्थित होते.
डॉ. कलाम यांनी आपल्या भाषणात ग्रॅन्ट हॅम्ब्लर, राईट बंधू, सी. व्ही. रामन, मॅडम क्युरी या संशोधकांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांचे याकडे लक्ष वेधले. या सर्व शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनकार्यात स्वत:ला झोकून दिले. म्हणूनच दूरध्वनी, विमान आणि किरणोत्सारी प्रारणांच्या क्षेत्रात संशोधन होऊ शकले. कुठलेही ध्येय साध्य करायचे असेल तर कष्टाची तयारी हवी असे ते म्हणाले.
डॉ. कलाम म्हणाले, जागतिक स्तरावर यशस्वी झालेल्या शास्त्रज्ञांचा इतिहास पाहिला तर त्यांनी संशोधन कार्यात झोकून दिले होते. अंतिम ध्येय साध्य होईपर्यंतचा त्यांचा हा लढा हा ख-या अर्थाने त्यांच्या यशस्वी जीवनाचा आदर्श ठरला. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पद्मश्री विखे यांनी हा परिसर काळाच्या पुढे नेला. त्यामुळे येथे मोठी प्रगती झाली. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाची तयारी ठेवावी लागेल. सातत्याने ज्ञानार्जन करून स्वत:ला विकसित करावे लागेल. आव्हानांना सामोरे जाऊन यशस्वी होण्यातच खरे धैर्य आहे. पद्मश्रींनी रात्रंदिवस काम करून या भूमीला विकसित केले. प्रवरेच्या भूमीतून धैर्याचाच संदेश सर्वांना मिळतो, असे त्यांनी सांगितले.  
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, प्रवरेच्या दृष्टीने आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी या शिक्षणसंकुलात घडले. चांगले संस्कार येथे झाल्याने आज सर्वांच्या समोर उभा राहू शकलो. ही सुवर्णमहोत्सवी वाटचाल ख-या अर्थाने एका इतिहासाची साक्ष आहे. पद्मश्रींच्या विचारांमुळेच जीवनाला दिशा मिळाली. या विकासाच्या वटवृक्षाखालील सावलीत आपण सर्व जण वावरत असलो तरी यासाठी पद्मश्रींनी केलेला त्याग खूप मोठा आहे असे ते म्हणाले.
डॉ. अशोकराव विखे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, डॉ. कलाम यांचे संस्थेवर व प्रवरेच्या परिसरावरही विशेष प्रेम आहे. यापूर्वीही ते येथे येऊन गेले. पद्मश्रींनी ५० वर्षांपूर्वी ग्रामीण विकासाचे रोपटे लावले, आजा त्याचा वृक्ष झाला आहे. मन तरुण आणि आनंदी राहावे हा संदेश डॉ. कलाम यांच्या उपस्थितीने सर्वांना मिळेल. सामाजिक बांधिलकी ठेवून, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतून सैनिकांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.