News Flash

कलम ३७० : राहुल गांधी, शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमित शाह

आमदार राणा जगजितसिंह, धनंजय महाडिक, आमदार जयकुमार गोरे यांनी केला भाजपात प्रवेश

पाच वर्षात पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीसच्या जोडीने महाराष्ट्राला समृद्ध केले, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोलापुरातील महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी केले. तर, कलम ३७० हटवल्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार आमच्यावर टीका करत आहेत मात्र या दोघांनी कलम ३७० वरची नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असेही शाह यांनी यावेळी म्हटले. या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.

याप्रसंगी  गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादीचे आमदार राणा जगजितसिंह, माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, प्रकाश मेहता आदींची  उपस्थिती होती.

गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी म्हटले की, दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांनी भाजपा व शिवसेनाला दोघांनाही सोबत घेऊन काम केले आहे. ३७० कलम हटविल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात निवडणुका होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचं आवाहनही शहा यांनी यावेळी केलं.

तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आम्ही थांबवले आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर त्यांनी भाजपाचा संपूर्ण दरवाजा उघडला तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवाय कोणीच काँग्रेस व राष्ट्रवादीत राहणार नाही, असाही टोला शाह यांनी लगावला.  तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात एकही घोटाळा झाला नसल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्याकडे जलसिंचन खात्याची जबाबदारी असताना केंद्राकडून ७२ हजार कोटी देण्यात आले होते. मात्र ते राज्यातील पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाही. भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवला, असेही गृहमंत्री शाह यावेळी म्हणाले.

कलम ३७० वरून काँग्रेससह राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, कलम ३७० हटवल्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार आमच्यावर टीका करत आहेत. मात्र त्यांनी कलम ३७० वरची नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. जेव्हा जेव्हा देशहिताचा मुद्दा आला तेव्हा काँग्रेसने नेहमी विरोधी भूमिका घेतलेली आहे.   चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा, असा सल्लाही शहा यांनी दिला. तसेच, काँग्रेसने नेहमीच आपल्या व्होटबँकेला देशहितापेक्षा जास्त महत्व दिले आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 8:57 pm

Web Title: home minister amit shaha in solapur mahjandesh yatra msr 87
Next Stories
1 विधानसभेची आचारसंहिता १३ सप्टेंबरला लागणार : केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे
2 “भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे”
3 आता महागाई, बेरोजगारीवरील देखावे दाखवा; संजय राऊतांचे मोदी सरकारवर शरसंधान
Just Now!
X