करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर संध्याकाळी वांद्रे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय जमल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच त्यांनी आपल्याला घरी जाऊ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणी विनय दुबे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे विनय दुबेला ओळखत असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसारित झालं होतं. दरम्यान, आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे.

“विनय दुबे याला मी ओळखत नाही. ८ दिवसापूर्वी मंत्रालयात भेटाण्यास आलेल्या व्यक्तींमध्ये एक रिक्षावाला होता. त्याने मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित नसल्यामुळे मला २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माझ्या कक्षात येऊन दिला. त्यावेळी त्याच्यासोबत जो व्यक्ती होता, तो बहुदा विनय दुबे होता,” असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

समाजमाध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई
“समाजमाध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यानुसार आतापर्यंत २०१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून ट्रेन नेहमी प्रमाणे धावतील अशी चुकीची माहिती ज्या ११ मार्गांनी पसरवली गेली त्याची माहिती व ज्या समाज माध्यमांचा गैरवापर केला गेला त्या अकाऊंन्ट्सचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसाप लवकरच कायदेशीर कारवाई सुरू होईल,” असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं.