गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी अमरावतीमधील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील दिवंगत अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वत: चुलीवर चहा करून बालगृहातील मुलांना दिला. हा क्षण बालगृहातील मुलांसाठीही अविस्मरणीय ठरला. यावेळी अनिल देशमुख यांनी बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षां हिचे कन्यादान आपण स्वत: करणार असल्याचे यावेळी सांगितलं.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आश्रमातील मूकबधिर मुलगी वर्षा तेथील मुलगा समीर याच्याशी विवाह ठरला असून, वर्षांचे कन्यादान गृहमंत्री यांनी करावे, असे शंकरबाबा पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ सकारात्मकता दर्शवत नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षांचे कन्यादान करू, असे सांगितले. यावेळी वर्षा व समीर या दोघांचा साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी पुष्पहार घालून दोहोंचेही अभिनंदन केले. शंकरबाबा हे मतिमंद मूकबधिर बेवारस मुलांसाठी अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

वर्षा आता २३ वर्षांची झाली आहे. ती नागपूरच्या रेल्वेस्थानकावर एक दिवसाची असताना पोलिसांना सापडली होती. न्यायालयाच्या माध्यमातून तिचे संगोपन वझ्झर येथील बालसुधारगृहात झाले. समीर हा शिर्डी येथे सापडला होता. सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोघांच्या गळ्यात हार टाकून साक्षगंधाचे सोपस्कार आटोपले. नागपूर येथे लग्नात शक्य झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आणणार असल्याचे देशमुख यांनी शंकरबाबांशी बोलताना सांगितले.

बेवारस व मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा करण्यासाठी आपण सर्वाधिक प्रयत्नशील असून, दिवंगत अंबादासपंत वैद्य मतिमंद बाल सुधारगृहात असलेल्या १८ वर्षांवरील बेवारस मूकबधिर, अंध मुलांना त्याचा लाभ होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

देशात दिव्यांग, मतिमंद मुलांना १८ वर्षांनंतर कुठे ठेवायचे, याचा कायदा नाही. हा कायदा व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शंकरबाबा पापळकर यांची धडपड सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांशी चर्चा करून विधानसभेत प्रश्न ठेवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंकरबाबांना यावेळी अभिवचन दिले.