News Flash

संभाजीराजे यांच्या आरोपावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सिंधुदुर्ग दौऱ्यात पोलीस बंदोबस्त का नेमण्यात आला होता, हे देखील सांगितलं आहे.

संग्रहीत छायाचित्र

“सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.” असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विटद्वारे केल्यानंतर, सर्वत्र खळबळ उडाली होती. यामुळे राज्यात विविध चर्चा देखील सुरू झाल्याने, अखेर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया देत, राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

“छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता.” असं गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षण : “सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय”; संभाजीराजे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

“सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?” असं संभाजीराजे छत्रपती यांनी सुरूवातीस ट्विटद्वारे म्हटलं होतं.

कोणते सरकार ?
दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. अनेकांनी त्यांना पाठिंबा देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे स्पष्ट केले. तर काहींनी ‘केंद्र की राज्य शासन पाळत ठेवत आहे हे स्पष्ट करा अन्यथा ते कुजबुज मोहिमेला कारणीभूत ठरेल,’ असेही म्हंटले.

पाळतीच्या आरोपाबाबत संभाजीराजे यांनी केला खुलासा, म्हणाले…

यानंतर संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत, “आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून हा विषय संपला आहे.” असं सांगून या विषयी खुलासा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 9:20 pm

Web Title: home minister walse patil reacted to sambhaji rajes allegation saying msr 87
Next Stories
1 पाळतीच्या आरोपाबाबत संभाजीराजे यांनी केला खुलासा, म्हणाले…
2 साताऱ्यात नवा विक्रम…! एका दिवसात ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता तयार
3 “जातीचं राजकारण मला दिल्लीत कळालं”; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Just Now!
X