25 October 2020

News Flash

मूकबधिर ‘वर्षां’चे कन्यादान गृहमंत्री करणार

वझ्झर येथील बालगृहाला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहात साक्षगंध प्रसंगी उपस्थित गृहमंत्री अनिल देशमुख.

वझ्झर येथील बालगृहाला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

अमरावती : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील दिवं. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली व या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षां हिचे कन्यादान आपण स्वत: करणार असल्याचे यावेळी सांगितले. गृहमंत्र्यांनी स्वत: चुलीवर चहा करून बालगृहातील मुलांना दिला, हा क्षण बालगृहातील मुलांसाठी अविस्मरणीय ठरला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आश्रमातील मूकबधिर मुलगी वर्षां तेथील मुलगा समीर याच्याशी विवाह ठरला असून, वर्षांचे कन्यादान गृहमंत्री यांनी करावे, असे शंकरबाबा पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ सकारात्मकता दर्शवत नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षांचे कन्यादान करू, असे सांगितले. यावेळी वर्षां व समीर या दोघांचा साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी पुष्पहार घालून दोहोंचेही अभिनंदन केले. शंकरबाबा हे मतिमंद मूकबधिर बेवारस मुलांसाठी अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

वर्षां आता २३ वर्षांची झाली आहे. ती नागपूरच्या रेल्वेस्थानकावर एक दिवसाची असताना पोलिसांना सापडली होती. न्यायालयाच्या माध्यमातून तिचे संगोपन वझ्झर येथील बालसुधारगृहात झाले. समीर हा शिर्डी येथे सापडला होता. सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोघांच्या गळ्यात हार टाकून साक्षगंधाचे सोपस्कार आटोपले. नागपूर येथे लग्नात शक्य झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आणणार असल्याचे देशमुख यांनी शंकरबाबांशी बोलताना सांगितले.

बेवारस व मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा करण्यासाठी आपण सर्वाधिक प्रयत्नशील असून, दिवं. अंबादासपंत वैद्य मतिमंद बाल सुधारगृहात असलेल्या १८ वर्षांवरील बेवारस मूकबधिर, अंध मुलांना त्याचा लाभ होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

देशात दिव्यांग, मतिमंद मुलांना १८ वर्षांनंतर कुठे ठेवायचे, याचा कायदा नाही. हा कायदा व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शंकरबाबा पापळकर यांची धडपड सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांशी चर्चा करून विधानसभेत प्रश्न ठेवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंकरबाबांना यावेळी अभिवचन दिले.

या आश्रमात १२३ विकलांग मुले आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण  झाली की नियमानुसार विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. तथापि, हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक आहे. वर्षांचे कन्यादान व समीरसोबत तिचे लग्न भव्य स्वरूपात करणार असल्याने हा मोठा आनंदाचा क्षण आहे. या भव्य विवाह समारंभाच्या निमित्ताने अनाथ, अपंग, मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचा विषय संपूर्ण देशपातळीवर चर्चेला येईल आणि यासंदर्भात कायदा होण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल.

– शंकरबाबा पापळकर, समाजसेवक, वझ्झर, ता. अचलपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 3:53 am

Web Title: home minister will do kanyadan of deaf mute girl varsha zws 70
Next Stories
1 मोहिते-पाटील अन् राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण
2 जमिनी घेताना आदिवासींची फसवणूक
3 प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘वरातीमागून घोडे’
Just Now!
X