करोनाच्या वाढत्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.  घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागामार्फत राज्यातील घरमालकांना करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात काढण्यात आलेल्या सूचना पत्रकात म्हटले आहे की, सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च पासून देशभरात लॉकडाउन सुरू आहे. जे की 3 मे पर्यंत राहणार आहे. या लॉकडाउनमुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक, व्यावसायिक हालचाली बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झालेला असून अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहेत. या कठीण अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला करोनाच्या समस्येबरोबरच अत्यंत कठीण अशा आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागत नाही.

राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असून वरील अडचणींच्या परिस्थितीमुळे भाडेकरुंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे, ही वस्तूस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रक्कम दिली न गेल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून काढू नये. अशा सूचना राज्यातील सर्व घर मालकांना देण्यता येत आहेत.  या पत्रकारवर अपर मुख्य सचिव संजय कुमार यांची स्वाक्षरी आहे.