31 May 2020

News Flash

बेघर वृद्ध दाम्पत्याला ‘स्माईल’चा आधार

पुणे येथील योगेश मालखरे यांनी साधारणत: चार महिन्यांपूर्वी बेघर लोकांना आधार देण्याची भूमिका घेतली.

वृद्ध मुदगुले दाम्पत्य

येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर निराधार अवस्थेत दिवस काढणाऱ्या ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याकडे रोज ये-जा करणारे पाहात होते. पण त्यांची व्यथा कुणालाच समजली नाही. अखेर भुकेने व्याकूळ, कृश बनलेल्या या दाम्पत्याची जगण्याची लढाई सुरू झाली आणि मग त्यांना जगवण्याची आधार देण्याची धडपड सुरू झाली. ही चर्चा शहरात निराधाराबाबत काम करणाऱ्या ‘स्माईल प्लस सोशल फाउंडेशन’च्या कानावर गेली. त्यांनी लगोलग मदतीचा हात दिला आणि या वृद्ध दाम्पत्याची रवानगी गोपाळपुरातील मातोश्री वृद्धाश्रमात करण्यात आली.

सीताबाई रामभाऊ मुदगुले (वय ७०) आणि रामभाऊ पिराजी मुदगुले (वय ८०) असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या मुलांचे अकाली निधन झाल्यामुळे हे दाम्पत्य फार पूर्वीच निराधार झाले होते. पण तरीही मोलमजुरी करत गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला होता. परंतु आता वय झाल्याने त्यांना मोलमजुरीचे कामही जमेना. यामुळे ते राहत असलेल्या घराचे भाडेही भरणे त्यांना शक्य होईना. यामुळे पुढे त्यांना राहते घर सोडावे लागले आणि बेकारीबरोबरच हे दाम्पत्य बेघरही झाले. निराधार झालेले हे वृद्ध दाम्पत्य पंढरपूर उपजिल्हा रुग्णालया नजीकच्या रस्त्यावरच वृद्धापकाळाच्या यातना भोगत दिवस कंठित होते. त्यांची ही व्यथा ‘स्माईल प्लस सोशल फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी याची दखल घेत या वृद्ध दाम्पत्यास गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये आसरा मिळवून दिला.

पुणे येथील योगेश मालखरे यांनी साधारणत: चार महिन्यांपूर्वी बेघर लोकांना आधार देण्याची भूमिका घेतली. यातूनच त्यांनी सुमारे ९० बेघरांना कायमस्वरूपी आसरा देण्याचे काम केले. पंढरीमध्ये विविध वारींच्या निमित्ताने सतत गर्दी असते. या गर्दीमध्ये अनेक मनोरुग्ण, बेघर, वृद्ध, भिक्षेकरी फिरत असतात. यातील गरजूंना संस्थेच्या वतीने आधार देण्यात येत आहे. यासाठी पंढरीतील दासबाबु खंडेलवाल, सचिन जाधव, दीपक सगर, रोहित गोयल, खंदारे, महेश सरवदे, अ‍ॅड. प्रवीण मुळे, डॉ. संगीता पाटील, सारीकाताई शेळके, शार्दुल नलबिलवार, अश्विनी साळुंखे, सचिन कसबे, प्रवीण नागणे आदी प्रयत्न करीत आहेत. याच कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मुदगुले दाम्पत्याला आधार देण्याचे काम नुकतेच पार पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 1:44 am

Web Title: homeless elderly couple get help from smile plus social foundation
Next Stories
1 विघ्नहर्त्यांमुळे कोकणात पुलांचे अपघात टळले!
2 अवैध रेती उत्खनन विरोधात कारवाई
3 रायगड जिल्हय़ातील ३४ हजार कुटुंबांना स्वच्छता विभागाची नोटीस
Just Now!
X