वसईच्या इतिहासात प्रथमच हे वर्ष असेल की नाताळ सणाचा उत्साह तर आहे, पण तो सार्वजनिक स्वरूपात साजरा करता येत नाही.  दरवर्षी मोठय़ा उत्सवात आणि जल्लोषात साजरा होणारा वसईचा नाताळ सण या वर्षी करोना या वैश्विक महामारीमुळे अगदी साध्या पद्धतीने आणि घरातच उत्साहाने साजरा होत आहे. मात्र सार्वजनिकठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.

दरवर्षी जल्लोषाने आणि शोभायात्रा, मिरवणुका आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाने फुलून जाणारे वसई पश्चिम पट्टीतील रस्ते या वर्षी ऐन येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या रात्री ओस पडले होते. प्रार्थनेसाठी फुलून जाणारे चर्च निर्मनुष्य होते. पारंपरिक वेशभूषा करून गजबजणारे नाके शांत होते. एकूणच वसई नाताळ सणासाठी सजली होती पण मात्र सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

वसईमध्ये नाताळची धामधूम नसली तरी वसईचा पश्चिम परिसर संपूर्ण रोषणाईने न्हाहून निघाला आहे. प्रत्येक घरात येशूच्या जन्माची तयारी केलेली  पाहायला मिळत आहे. पण या वर्षी दरवर्षीप्रमाणे असलेली लगबग मात्र जाणवत नव्हती. रात्रभर खुली असणारी दुकाने संचारबंदीमुळे रात्री १० वाजताच बंद झाली होती. नाताळनिमित्त घरी पाहुण्यांची लागणारी रीघ  नव्हती. त्याचबरोबर नाताळच्या निमित्ताने सजलेले गोठे पाहण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील पर्यटकांची गर्दी या वेळी नव्हती. गावागावात ख्रिसमस कार्निव्हलमध्ये पारंपरिक वेश परिधान करून तरुण-तरुणी, महिला, आनंद लुटण्यासाठी सहभागी होत असतात. पण या वेळी करोना संकटाने सर्वानाच घरात बसविले आहे.  वसईतील सर्वच चर्च मोठय़ा रोषणाईत न्हाहून निघाले आहेत. पण त्यात होणाऱ्या सार्वजनिक मिस्सा, प्रार्थना या वर्षी झाल्या नाहीत. यामुळे हे चर्च रोषण होऊनही उदास वाटत होते.

वसईत अनेक तलावांमध्ये तरंगते गोठे उभारले आहेत. त्यावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे गोठे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असतात पण या वेळी हे गोठे पाहण्यासाठी कुणी दिसले नाही.  नाताळ आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी  वसईचा पश्चिम समुद्रकिनार पट्टा मुंबई ,ठाणे, पनवेल, कल्याण— डोंबिवली या भागांतून दरवर्षी हजारो पर्यटक हजेरी लावतात. पण या वेळी इथले रिसॉर्ट, हॉटेल ओस पडले आहेत.