अकरा वर्षे संसार केलेल्या नवऱ्याला गावातील पंचासमक्ष सोडचिठ्ठी देऊन एका विवाहीत महिलेने तिच्या मैत्रिणीसोबत समलैंगिक संबंध ठेवून लग्न केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली या अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्य़ातील एटापल्ली येथे उघडकीस आली. नक्षलवाद्यांच्या रक्तरंजित प्रदेशात फुललेली ही अनोखी समलैंगिक प्रेमकथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. दरम्यान, या प्रेमकथेची सर्वत्र चर्चा आहे.
एटापल्ली हा सर्वाधिक नक्षलग्रस्त तालुका आहे. याच तालुक्यात ११ फेब्रुवारी २००४ रोजी एका महिलेचा पारंपरिक पध्दतीने विवाह झाला. दोन वर्षांच्या सुखी संसारवेलीवर एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन फुले उमलली. सर्व काही गुण्यागोविंदाने सुरू असतांनाच रोजगाराच्या निमित्ताने चौघा जणांचे कुटुंब मुलचेरा तालुक्यातील देशबंधु या गावी स्थलांतरित झाले. तेथे या विवाहीत महिलेची ओळख एका अविवाहीत मुलीसोबत झाली. नवरा कामावर गेला की, दोघीही घरी निवांतपणे भेटत. अशातच दोघींमध्ये समलैंगिक संबंध अधिक दृढ होत गेले. नक्षलग्रस्त प्रदेशातील या भूमीवर समलैंगिक संबंधांची नवीन क्रांती होत असल्याचे चित्र गावातील प्रत्येक व्यक्ती बघत होता. गावात या समलैंगिक संबंधांची बोंब होताच दोघी लोकांच्या नजरा चुकवत भेटू लागल्या. गावात प्रत्येकाच्या तोंडी या संबंधांची चर्चा सुरू झाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी २०११ मध्ये तिचे लग्न छत्तीसगडमधील रायपूर येथील युवकाशी लावून दिले. मात्र, लग्नानंतरही या दोघींच्या गाठीभेटी सुरूच होत्या. यावरून नवरा-बायकोत खटके उडू लागले.
याच दरम्यान ही महिला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी रायपूला गेली असता दोन महिने परतलीच नाही. यानंतर २०१४ मध्ये महिला एटापल्लीला परत आली. काही महिने होत नाही तोच तिची मैत्रीणही एटापल्लीला आली. याच दरम्यान दोघींनी नवऱ्यासोबत न राहता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या दोघींच्या निर्णयात नवरा मध्ये येत असल्यामुळे दोघींनीही नवऱ्याला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विवाहीत महिलेने अलीकडे २ जूनला नवऱ्यापासून सोडचिठ्ठी मिळावी म्हणून एटापल्ली येथे तीन पंचासमोर बैठक बोलावली. यावेळी सोडचिठ्ठीचे शपथपत्र तयार करून त्याची प्रत एटापल्ली पोलिस ठाण्यात देण्यात आली. विशेष म्हणजे, नवऱ्यापासून झालेल्या दोन्ही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारीही या महिलेने स्वीकारली.
पंचांसमोर या महिलेने नवऱ्याला सोडचिठ्ठी दिली असली तरी तहसील कार्यालय किंवा न्यायालयीन मार्गाने ही सोडचिठ्ठी झालेली नसल्यामुळे कागदपत्रेही तयार झालेले नाही. या अनोख्या प्रेमकथेने सर्वानाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, आजही या दोघी सोबत वास्तव्य करत असून त्यांच्या समलैंगिक प्रेमाची चर्चा नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या जंगलातील प्रत्येकाच्या तोंडी  आहे. ही प्रेमकथा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली असली तरी पोलिस अधिकारी व तहसीलदार काहीही बोलायला तयार नाहीत.