चंद्रपूर : फेसबुक, मॅसेंजर व व्हॉट्सअ‍ॅप या समाज माध्यमावर  बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाज माध्यमावर बदनाम करू, अशा पद्धतीने ‘हनी ट्रॅप’चे प्रकार वाढले आहेत. चंद्रपुरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण मुलाला अशाच पद्धतीने एका सुंदर तरुणीने त्याचे बनावट अश्लील छायाचित्र तयार करून समाज माध्यमावर सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलाला शनिवारी सकाळी समाज माध्यमावर एका सुंदर मुलीने हॅलो, हाय असा संदेश पाठवला. मुलगी सुंदर दिसल्याने मुलगाही तिच्या जाळय़ात अलगद अडकला. त्यानेही तिला उत्तर दिले. मुलाकडून प्रतिसाद मिळाल्याचे बघून मुलीने थेट त्याचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर काही वेळातच मुलाच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’मध्ये एका सुंदर मुलीसोबतचे अश्लील छायाचित्र पाठवण्यात आले. त्यामध्ये सुंदर मुलीसोबत या मुलाचेही संगणकावर तयार केलेले अर्धनग्न छायाचित्र होते. सदर अश्लील छायाचित्र बघून तो घाबरला, गोंधळला, मात्र स्वत:ला सावरत त्याने घडलेला प्रकार वडिलांजवळ कथन केला. त्यानंतर या प्रतिष्ठित कुटुंबाने थेट शहर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शहर पोलिसांनी सायबर क्राईम शाखा येथे त्यांना पाठवले. तिथे सायबर पोलिसांनी मुलाचा भ्रमणध्वनी तपासून त्यातील सत्यता शोधून काढली. यामध्ये संबंधित तरुणीने मुलाचे संगणकावर बनावट छायाचित्र केल्याचे दिसून आले. दरम्यान, या ‘हनी ट्रॅप’च्या प्रकारामुळे तरुण तरुणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. तेव्हा पोलिसांनीही समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा, स्वत:चे फेसबुक प्रोफाईल लॉक करून ठेवावी, अनोळखी व्यक्तींना मॅसेंजरवर संवाद साधू नका, असे आवाहन केले आहे.

अश्लील चित्रफितीची मागणी, गडचिरोलीत एकाला अटक

गडचिरोली : सोशल मिडीयावर बनावट अकांऊट तयार करून मैत्री करायची. मत्री झाल्यानंतर अश्लील चित्रफितीची मागणी करायची. संबंधित कुटुंबीयांना चित्रफिती पाठवून खंडणी मागणे तसेच ‘सेक्सोटार्शन’ करण्याचा गंभीर प्रकार गडचिरोली येथे समोर आला आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी प्रदीप नत्थू खेवले याला अटक केली आहे. त्याने गुन्हय़ाची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गौरव गावंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.