सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी आई वडिलांनी मुलीचा खून केला आहे. बी.ए.एम.एस. चे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षांच्या मुलीने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून वडिलांनी मुलीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलगर बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली आहे. रागाच्या भरात वडिलांनी आणि आईने मुलीला ठार केले त्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विठ्ठल धोंडिबा बिराजदार आणि त्यांची पत्नी श्रीदेवी विठ्ठल बिराजदार या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

अनुराधा विठ्ठल बिराजदार असं हत्या झालेल्या मुलीचं नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अनुराधा कर्नाटकातील सिंदगी या ठिकाणी बी.ए. एम. एस. चे शिक्षण घेत होती. विठ्ठल बिराजदारांकडे सालगडी म्हणून काम करणाऱ्याच्या मुलाने अनुराधाशी सिंदगी येथे जाऊन लग्न केले. विठ्ठल बिराजदारला म्हणजेच अनुराधाच्या वडिलांना या प्रेमविवाहाची माहिती मिळाली. ज्यानंतर त्याने सिंदगीला जाऊन अनुराधाला घरी आणले. २ ऑक्टोबरच्या दिवशी पहाटे बिराजदार बोराळे गावातील फिर्यादी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे आला तिला सोडले. अनुराधाने प्रेमविवाह केल्याने विठ्ठल बिराजदार संतापला होता.

सालगड्याच्या मुलासोबत लग्न करून मुलीने माझी बदनामी केली, आता मी तिला सोडणार नाही असे सांगून विठ्ठल बिराजदार बोराळेतून निघून गेला. गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास बिराजदार पुन्हा एकदा बोराळेमध्ये आला. अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे तिला गेऊन जातो असे सांगून तिला इनोव्हा गाडीमध्ये बसवून घेऊन गेला. शुक्रवारी सलगर या ठिकाणी नेऊन विठ्ठल आणि त्याची पत्नी श्रीदेवी या दोघांनी अनुराधाला ठार केले आणि पहाटेच चारच्या सुमारास शेतातच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

मृत अनुराधाने मृत्यूपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यामध्ये तिने वडिल आणि सावत्र आईपासून माझ्या जीवाला धोका आहे असे नमूद केले होते. माझे आई वडिल मला मानसिक त्रास देत आहेत, मला ठार करण्याच्या प्रयत्नात आहेत हे मला लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे असेही अनुराधाने लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चिठ्ठ्यांच्या आधारे अनुराधाच्या आई वडिलांना अटक करण्यात आली. आता या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातो आहे.