जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २८ एप्रिल रोजी नितीन आगे याची हत्या हा ऑनर कििलगचाच प्रकार होता, असा प्राथमिक निष्कर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काढला असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
नितीन आगे याच्या हत्येच्या घटनेला दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलीशी त्याच्या असलेल्या मैत्रीची पाश्र्वभूमी होती. पौगंडावस्थेतील स्त्री-पुरुष आकर्षण, विवाह संबंधाच्या संकल्पनांचा चुकीचा पगडा, पालक व कुटुंबाच्या पातळीवर सुसंवादाचा अभाव या सर्व सामाजिक वास्तवाचा बळी म्हणूनही या घटनेकडे पाहावे लागेल, असे सांगून ते म्हणाले, की सदर घटनेला जातीय द्वेष कारणीभूत नाही. खर्डा गावात त्या अनुषंगाने दलित-मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जाऊ नयेत, सामाजिक दुही निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रतिष्ठा वा परिपक्व आकलनाच्या अभावातून होणाऱ्या हत्या व खून याविषयी चर्चा व उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने लवकरच परिषद आयोजित केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, बाबा आरगडे, नागेश कुसळे, संजय जोशी, प्रमोद भारळे यांच्यासह कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या पुढाकाराने जामखेडमधील खर्डा येथे समितीच्या सदस्यांनी आगे कुटुंबीयांची भेट घेतली. त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी धीरेन पाटील व पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांची भेट घेऊन तपशिलाची माहिती घेतली.