News Flash

संत गाडगेबाबांच्या जन्मभूमीला विकासाची आस !

राज्य शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने गाडगेबाबांच्या जन्मगावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मोहन अटाळकर

समाजाला स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव म्हणजे अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव हे आजवर दुर्लक्षित. त्यांच्या जन्मभूमीचा विकास व्हावा, ही  गेल्या अनेक वर्षांची मागणी. पण, किरकोळ निधीच्या व्यतिरिक्त शेंडगावला काही मिळाले नाही. २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेंडगावला गाडगेबाबांच्या अर्धाकृ ती पुतळयाचे अनावरण झाले. विकास आराखडय़ाची घोषणा झाली, तरीही कामांना गती मिळू शकली नाही, ही खंत लोक बाळगून होते. अखेरीस राज्य शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने गाडगेबाबांच्या जन्मगावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.

ज्या गाडगेबाबांच्या नावे महाराष्ट्रात विविध ठिकाणी धर्मशाळा अस्तिवात आहेत. एका विद्यापीठाला त्यांचे नाव दिले जाते. त्या संत गाडगेबाबांच्या घराचे अस्तित्व टिकवले जात नाही. शेंडगाव येथे एका समाजमंदिराच्या व्यतिरिक्त त्यांच्या कार्याची ओळख पटवून देणारी एकही वास्तू नाही, हे शल्य गाडगेबाबांच्या विचारांना मानणाऱ्या मोठय़ा वर्गात होते. आता शेंडगावसोबतच गाडगेबाबांची कर्मभूमी ऋणमोचन, नागरवाडी, वलगाव आणि अमरावती येथेही संयुक्त आराखडय़ातून विकास कामे पूर्ण केली जाणार आहेत. विकास आराखडय़ात १८.३६ कोटी रुपयांच्या निधीतून धर्मशाळेचे बांधकाम, संत गाडगेबाबा स्मृति भवन, बहुउद्देशीय सभागृह, न्याहारी भवन, आर्ट गॅलरी, ग्राम सफाई अभियान प्रशिक्षण केंद्र, विद्युतीकरण, सिमेंट रस्ते, घाटांचे बांधकाम, प्रसाधन गृह इत्यादी कामांचा समावेश आहे. येत्या दहा महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. जिल्ह्य़ाच्या पालकमंत्री यशोमती ठाकू र यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

शेंडगाव हे दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावरील एक छोटेसे गाव. या गावाच्या विकासासाठी हालचाली आताच झाल्या असे नव्हे, पण विकास कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाही. ही गावकऱ्यांची मोठी खंत आहे. १९८८ मध्ये पर्यटन विकास आणि सांस्कृ तिक कार्य मंत्रालयाने शेंडगाव हे पर्यटनस्थळ घोषित केले. त्यावेळी राज्य सरकारने गावाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. एका वास्तूविशारदामार्फत सरकारकडे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी शासनाकडे ३५ लाख रुपयांची योजना सादर केली होती. मात्र निधी मिळायला विलंब झाला. १९९० मध्ये समाजमंदिराचे भूमिपूजन पार पडले. पण, नंतर कामे रखडली.

गेल्या वर्षी जुलैमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी शेंडगावला भेट दिली. त्यावेळी गावात शून्य विकास असल्याची खंत व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस सरकारने तीन कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला, मात्र एक रुपयाही त्यांचे सरकार देऊ शकले नाही, अशी टीका केली होती.

संत गाडगेबाबांची जन्मभूमी शेंडगाव तरी संपूर्ण महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी. हयातभर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर टीका करून समाजाचे प्रबोधन केले. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देत असतानाच स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत होते. स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला.

विकास आराखडय़ात नियोजित कामांसह  इतरही आवश्यक कामांचा समावेश केला जाईल. संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमी असलेल्या सर्व गावांचा संयुक्त आराखडय़ातून विकास करण्यात येईल. निधीची कमतरता पडू देणार नाही. संत गाडगेबाबा यांनी मानवतावादाची शिकवण दिली व अंधश्रद्धा नाकारल्या. ते थोर कर्मयोगी होते. त्यामुळे आपणही बाबांची खरी शिकवण अंगिकारली पाहिजे व पूजा अर्चा आदी टाळून कृतीवर भर दिला पाहिजे. संत गाडगेबाबा मिशनमध्ये सदस्यपद मिळणे हा आपल्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे.

– यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:11 am

Web Title: hope for development in the birthplace of saint gadge baba abn 97
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल वृद्धाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
2 केळवे पर्यटन व्यवसाय खड्डय़ात जाण्याच्या मार्गावर
3 तांत्रिक बदल सक्तीचे
Just Now!
X