वसई-विरारमध्ये दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे शहरात धारण तलावांची गरज (होल्डिंग पॉण्ड्स) निर्माण होऊ  लागली आहे. मात्र २००६ मध्ये सिडकोने शहरात दोन धारण तलावांच्या जागा आरक्षित केल्या होत्या, मात्र त्याची माहितीच पालिकेकडे नसल्याचे उघड झाले आहे; परंतु पालिकेच्या अलीकडील अभ्यासात या दोन धारण तलावांचा शोध लागला असून त्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ  लागली आहे. नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा भराव, अनियंत्रित आणि नियोजनशून्यतेने झालेली बांधकामे यामुळे शहरावर सलग दोन वर्षे जलसंकट ओढवले आहे. पावसाचे पाणी शहरात साठू नये, त्या पाण्याला जागा मिळावी यासाठी धारण तलाव बांधले जातात. तशी तरतूद शहराच्या नियोजन आराखडय़ात करावी लागते. मात्र वसईत यापूर्वी दोन धारण तलावांची तरतूद असल्याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याची बाब उघड झाली आहे.

सिडकोने २००६ मध्ये केंद्राच्या समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानंतर शहरात प्रत्येकी दोन धारण तलावांच्या जागा आरक्षित केल्या होत्या. त्या जागा मिठागर परिसरात होत्या. प्रत्येकी ६० एकर धारण तलावांची जागा आहे. वसईच्या पूरस्थितीचा अभ्यास करणाऱ्या ‘निरी’च्या (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) समितीने धारण तलावांची गरज व्यक्त केली होती. पालिका आयुक्त बी. जी. पवार यांना अभ्यासात या दोन धारण तलावांच्या जागेचा शोध लागला. पालिका आता या धारण तलावांचा विकास करणार आहे. या धारण तलावांची खोली वाढवली जाणार आहे. त्यातील पाणी खाडीला सोडण्यासाठी मार्गिका तयार केल्या जाणार आहेत. या धारण तलावांच्या जागा मिठागर परिसरात असल्याने अद्याप त्यावर अतिक्रमण झालेले नाही. शहरात पूरस्थिती निर्माण होऊ  नये यासाठी आम्ही विविध स्तरांवर अभ्यास करत होतो. त्या वेळी आम्हाला दोन धारण तलाव असल्याचे समजले. आता या धारण तलावांच्या जागेचा विकास केला जाणार आहे.