संगमनेर : जिल्ह्यत सर्वाधिक करोनाचा उद्रेक झालेल्या संगमनेर तालुक्यात सध्या ५८८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २२ हजार रुग्णसंख्येच्या उंबरठय़ावर असलेल्या तालुक्यातील करोना स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.  तालुक्यातील जवळपास शंभरावर गावे करोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.

संगमनेर शहर आणि तालुक्यात अद्यापही मोठय़ा प्रमाणात करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यतील ही सर्वाधिक संख्या ठरत असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने करोना आढावा बैठक घेत महसूल व आरोग्य प्रशासनाला वारंवार सूचना केल्या होत्या. प्रशासनातील अधिकारीही आपापल्या परीने करोना विरुद्धचा लढा जिकिरीने लढत होते. परिणामी तालुक्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांमध्ये अगदी वाडय़ा—वस्त्यांवर देखील बाधित रुग्ण आढळून आले होते.

याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यतून उपचारासाठी रुग्णांनी संगमनेर गाठले होते त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे देखील मुश्किल बनले. सद्याच्या स्थितीत बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागल्याने तालुक्यात समाधानाचे चित्र आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यतील निर्बंधअद्यापही शिथिल करण्यात आलेले नाहीत त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.

गुरुवारी आलेल्या आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत संगमनेर तालुक्यात २१९३९ बाधित रुग्ण आढळले आहे. तर १०१ रुग्णांचा मृत्यू झाला. २१२५० बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत १११६७८ नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील आता ९७ टक्कय़ावर जाऊन पोहोचले आहे.

रुग्णसंख्या घटत चालली

संगमनेर शहरात १४७ रुग्ण उपचार घेत असून घुलेवाडी, साकुर, राजापूर, गुंजाळवाडी, पेमगिरी, संगमनेर खुर्द, निमगाव जाळी व सावरगाव तळ या गावांमध्ये दोन अंकी तर उर्वरित तालुक्यातील गावात १ते ९ या दरम्यान रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच ही गावेदेखील करोनामुक्त होण्याची शक्यता आहे. तर सत्तर गावांमधील रुग्ण संख्या शून्यावर आली असल्याने ही गावे देखील करोना मुक्त झाली असल्याचे सांगण्यात येते.