News Flash

मोठा अनर्थ टळला…! नसता परभणीत झाली असती नाशिकची पुनरावृत्ती

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची गळती

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागल्यानंतर काळाने डाव साधत तब्बल २४ रुग्णांचे प्राण हिरावून घेतले होते. नाशिकसारखाच मोठा अनर्थ परभणीत घडणार होता. परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर मंगळवारी (दि. २७) रात्री साडे अकराच्या सुमारास झाडाची फांदी पडली. यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचा गंभीर प्रकार घडला. मात्र, प्रसंगावधान राखत वेळीच उपाययोजना केल्यानं मोठी दुर्घटना टळली, नसता ही बेपर्वाई रुग्णांच्या जीवावर बेतली असती.

जिल्हा शासकीय रुग्णालयात करोना रूग्णांना ऑक्सिजन पुरवणारी पाईपलाईन चक्क उघड्यावर आहे. नाशिक येथील घटनेनंतर ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा सुरक्षित रहावी याची काळजी सर्वत्र घेतली जात असताना परभणीत मात्र ही पाईपलाईन उघड्यावर होती. त्यातच रात्री वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे जिल्हा सरकारी दवाखान्यातील निलगिरीच्या एका झाडाची फांदी या उघड्या पाईपवर पडल्यानंतर तो पाईप खाली कोसळला. त्यातून ऑक्सिजनची गळती सुरू झाली. या वेळी तिथे असलेल्या शंकर नाईकनवरे यांनी तातडीने मोबाईलवरून ही बाब खासदार संजय जाधव यांना कळवली.

काही वेळात खासदार जाधव त्या ठिकाणी दाखल झाले. दरम्यान त्याचवेळी तिथे असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मोबाईल वरून घडलेल्या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. देशमुख यांनी यावेळी घडलेला प्रकार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही मोबाईल वरून कळवला. त्यांच्याच मोबाईलवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संवाद साधला. घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वाडकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना अशा सर्व अधिकाऱ्यांचा ताफा तातडीने दाखल झाला.

गळती थांबविण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे हे घटनास्थळी उशिराने दाखल झाले. नाशिकच्या दुर्घटनेपासून कोणताही बोध परभणीचा आरोग्य यंत्रणेने घेतला नाही ही बाब यानिमित्ताने स्पष्ट झाली. केवळ निलगिरीच्या झाडाची फांदी खाली पडल्यानंतर जर ऑक्सिजनच्या पाईपलाईनची गळती होत असेल, तर ही बाब संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा कळस आहे, असं आता बोललं जात आहे. दोन-तीन दिवसांपासून हवामान विभागाच्यावतीने वादळी वाऱ्यासह  पावसाचा अंदाज व्यक्त होत असताना ऑक्सिजनच्या पाईपलाईनला कोणतीही सुरक्षितता पुरवली गेली नाही.

“आपल्याला हा प्रकार कळल्यानंतर आपण तातडीने घटनास्थळी दाखल झालो. घडलेला प्रकार गंभीर आहे. रात्री दोन वाजेपर्यंत पाईपलाईन दुरुस्त करून ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला,” अशी माहिती यावेळी खासदार संजय जाधव यांनी दिली. “संबंधित कक्षातील १४ रुग्णांना इतरत्र हलविण्याची गरज पडली नाही. ऑक्सिजन पुरवठा वेळीच सुरळीत झाला,” असेही खासदार जाधव म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:55 pm

Web Title: horrible incident nashik oxygen tank leakage parabhani oxygen pipeline broke bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवला पाहिजे”
2 उद्धव ठाकरेंप्रमाणे देशाला काम करावं लागेल – संजय राऊत
3 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं करोनामुळे निधन
Just Now!
X