एजाजहुसेन मुजावर

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून २० दिवस लोटले तरी सत्तास्थापना न झाल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेसाठी घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र अशा अस्थिर राजकीय वातावरणात अकलूजमध्ये यंदा खरोखर घोडय़ांचा बाजार फुलला आहे. गेल्या पंधरा दिवसात या घोडे बाजारात जातिवंत असे अडीच हजारांपेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ६५० घोडय़ांची विक्री झाली आहे. मात्र राज्यात मागील महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम अकलूजच्या या घोडेबाजारावरही काही प्रमाणात जाणवत आहे. काही जातीवंत घोडय़ांना ५० लाखांपर्यंत बोली सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात व्यापारी अजून अपेक्षित दर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Nashik, Onion auction, Onion, Lasalgaon
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

दिवाळी-पाडवा व कार्तिकी यात्रेनंतर अकलूजमध्ये घोडेबाजार भरतो. यंदा दिवाळी- पाडव्याच्या दिवशी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते या घोडेबाजाराचा शुभारंभ झाला. अकलूज कृषिउत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या घोडेबाजाराचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. सुरूवातीच्या काही वर्षांतच अकलूजचा हा घोडेबाजार देशातील मुख्य घोडेबाजारात गणला जाऊ लागला आहे.

राज्यात सारंगखेडा, अजमेरजवळील पुष्कर येथे यात्रेत घोडेबाजार प्रसिद्ध आहेत. तसाच लौकिक अकलूजनेही मिळविला आहे. सध्या या बाजारात २५४० घोडे दाखल झाले आहेत. यात गेल्या पंधरा दिवसात ६२० घोडय़ांच्या विक्रीतून पाच कोटी ४० लाखांची आर्थिक उलाढाल झाली आहे. यात एका घोडय़ाला पाच लाखांचा दर मिळाला आहे. काही जातिवंत घोडय़ांना ५० लाखांपेक्षा जास्त दर आहेत. त्याप्रमाणे काही घोडय़ांच्या खरेदीची बोली झाली आहे. पंचकल्याणी, अबलख, पंजाबी, नुखरा, मारवाड, काटेवाडी, सिंध अशा अनेक प्रकारच्या जातिवंत व दुर्मीळ घोडय़ांना पाहण्यासाठी व खरेदीसाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठय़ा प्रमाणात अश्वशौकीन अकलूजला येत आहेत.  महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, दिल्ली आदी भागातून सुमारे शंभर घोडे व्यापारी अकलूजमध्ये आले आहेत.

या घोडेबाजारात सहा महिन्यांपासून ते एका वर्षांपर्यंतच्या दर्जेदार व जातिवंत घोडय़ाची  किंमत जास्त सांगितली जात असून अशा घोडय़ांनाच जास्त प्रमाणात मागणी होत आहे.

घोडय़ांचे रूप, खुणा, शुभ गुण, स्वभाव आदी प्रमुख निकष पाहून घोडय़ांच्या किंमती सांगितल्या जात असल्या तरी त्यांचा ऐटबाजपणा, रुबाबदारपणा, तसेच रपेट, मंद चाल, द्रूत चाल, नाचकाम यांचेही निरीक्षण करून घोडय़ांच्या किमती ठरविल्या जातात.

अकलूजच्या घोडेबाजारात फेरफटका मारला असता तेथे खरेदीदारांच्या समोर घोडय़ांची ऐटबाज चाल, धावण्याची पद्धत आणि हलग्यांच्या तालावर नाचकाम आदींची प्रात्यक्षिके होताना दिसून आली.

पंजाबी जातीपैकी ‘रूद्र’ नावाच्या पांढऱ्या घोडय़ाला ५० लाख रुपयांचा भाव व्यापाऱ्याकडून सांगितला जात होता. याच पद्धतीने मारवाड जातीच्या संकरा, राणा अशा घोडय़ांनाही ५० लाखांपर्यंत भाव मागितला जात आहे. त्याप्रमाणे बोलीही केली जात आहे. ‘रूद्र’ हा पाच वर्षांचा जातिवंत घोडा आहे. त्याची उंची ६८ इंच एवढी आहे. याच पद्धतीने मारवाड जातीचा काळाभोर ‘संकरा’ नावाचा घोडादेखील या घोडेबाजाराचे आकर्षण ठरला आहे.

अकलूजमध्ये घोडेबाजारासाठी कृषिउत्पन्न बाजार समितीकडून अनेक चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. यात घोडे खरेदी-विक्रीचे व्यवहार चोख, पारदर्शक आणि विश्वासार्हतेने केले जातात. यंदा परतीच्या पावसाचा घोडय़ांना त्रास होऊ नये म्हणून बाजारतळावर मुरूमाचे उंचवटे उभारण्यात आले आहेत.  डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दररोज दोन सत्रात रासायनिक औषधांची फवारणी केली जाते.

-राजेंद्र काकडे, सचिव, अकलूज कृषिउत्पन्न बाजार समितीअकलूजचा घोडेबाजार गेल्या पंधरा दिवसांत बहरला असून घोडे खरेदीसाठी देशभरातून खरेदीदार दाखल होत आहेत. बाजारातील एका जातिवंत, ऐटबाज घोडय़ाचे हे दृश्य.