नगर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आज, सोमवारी शहर काँग्रेसने आगळेवेगळे आंदोलन करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोडय़ावरून बाजारपेठेत फेरफटका मारण्याचे आंदोलन करत इंधन दरवाढीचा निषेध केला. तसेच सर्जेपुरातील सबलोक पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली.

पक्षाचे पदाधिकारी मनोज गुंदेचा, बाबासाहेब धोंडे, अनंतराव गारदे, खालील सय्यद, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते,  अक्षय कुलट, वीरेंद्र ठोंबरे, सुजित जगताप, हनीफ शेख, कौसर खान, डॉ. मनोज लोंढे, नलिनी गायकवाड, जरीना पठाण, अज्जूभाई शेख, प्रशांत वाघ, मुबिन शेख, मोहनराव वाखुरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

पेट्रोल पंपावर निदर्शने झाल्यानंतर काँग्रेसने सर्जेपुरा चौक ते कापडबाजार दरम्यानच्या रस्त्यावर घोडय़ावरुन भाजप सरकारच्या विरोधात प्रतीकात्मक मिरवणूक काढली. घोडय़ावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे होते. घोषणांमुळे बाजारपेठ दणाणून गेली होती. यावेळी कार्यकर्त्यांंनी दुचाकी लोटत सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.

पेट्रोल पंपावर गांधीगिरी

यावेळी पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देत गांधीगिरी केली. नागरिकांना पेट्रोलचे दर काँग्रेस कार्यकर्त्यांंनी विचारले. नागरिकांनी १०० रुपये दर असल्याचे सांगत, केंद्र सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांंनी दरवाढीच्या विरोधात जनजागृती केली. लखन छजलानी, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, मच्छिंद्र साळुंखे, प्रशांत जाधव, शरीफ सय्यद, अक्षय पाचारणे, अजय घोलप, आदित्य यादव, अजय खराडे आदी सहभागी होते.