हल्ला कोणी केला याबाबत संभ्रम

पारनेर : तालुक्यातील म्हस्के वाडी येथे वन्य प्राण्याने केलेल्या हल्लय़ात मेंढपाळाची घोडी ठार झाली. बिबटय़ाच्या हल्लय़ात घोडी ठार झाल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांनी व्यक्त केला आहे. मात्र चार दिवसांपूर्वी म्हस्केवाडी येथील तरुणांना पट्टेरी वाघ आढळला असल्याने घोडीवर हल्ला बिबटय़ाने केला किंवा वाघाने केला याबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संशय आहे. वन विभागाने योग्य तो तपास करुन अळकुटी पंचक्रोशीत वाघाचा वावर आहे किंवा नाही ते स्पष्ट करुन संभ्रम दूर करावा, अशी मागणी म्हस्केवाडीचे सरपंच किरण पानमंद यांनी केली आहे.

म्हस्केवाडी येथील शिंदे मळा रस्त्यावर,दीपक मंडले यांच्या घराच्या मागच्या बाजूला, मेंढपाळ बाळू चोरमले यांच्या वाडय़ातील घोडीवर बुधवारी रात्री वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्लय़ात घोडीच्या गळ्याला खोल जखम झाल्याने घोडी गतप्राण झाली.

वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांनी आज(गुरुवारी) सकाळी घटनास्थळाला भेट देऊ न पाहणी केली. त्याठिकाणी आढळलेले वन्य प्राण्याच्या पावलांचे ठसे जतन करण्यात आले आहेत.परीक्षणासाठी ठसे तज्ज्ञांकडे पाठवण्यात येणार आहेत.दरम्यान ठश्यांची छायाचित्रे जळगाव येथील वन्यजीव अभ्यासकांकडे पाठवण्यात आली होती.त्यांनी पावलांचे ठसे बिबटय़ाचे असल्याचा निर्वाळा दिला असल्याचे श्रीमती गोरे यांनी सांगितले.नगर जिल्ह्यात बिबटय़ांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने सर्वसाधारण बिबटय़ांपेक्षा जिल्ह्यातील बिबटे धष्टपुष्ट असतात. त्यांच्या पावलांचे ठसेही इतरत्र आढळणाऱ्या बिबटय़ांच्या तुलनेत मोठे असतात असे श्रीमती गोरे यांनी स्पष्ट केले.

म्हस्केवाडी पंचक्रोशीत पट्टेरी वाघाचा वावर आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.नागरिकांनी घाबरु नये मात्र खबरदारी घ्यावी.शक्यतो रात्री घराबाहेर पडू नये. घराभोवती उजेडाची व्यवस्था करावी.मिरच्यांचा धूर करावा असे आवाहन श्रीमती गोरे यांनी केले आहे.

म्हस्केवाडी पंचक्रोशीत पट्टेरी वाघाचा वावर आहे किंवा नाही याबाबत कोणत्याही निष्कर्षांप्रत वनखाते आलेले नाही. ज्या तरुणांनी पट्टेरी वाघ आढळल्याचा दावा केला आहे त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.त्यांनी तयार केलेल्या ध्वनिचित्रफितीची सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे.या परिसरातील वन्यप्राण्यांचा मागोवा घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

सुवर्णा माने,जिल्हा वनसंरक्षक, नगर.