वाडा : चक्रीवादळाचा फटका समुद्रकिनाऱ्यापासून ६० ते ७० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या वाडा, विक्रमगड तालुक्यालाही बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडल्याने काही घरांचे नुकसान झाले तर या वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी, आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वाडा, विक्रमगड या दोन तालुक्यांत जवळपास ११५० हेक्टर क्षेत्रावर आंब्याच्या बागा आहेत. तर काही ठिकाणी केळीच्या बागा आहेत.  येथील शेतकरी विशेषत: केशर व हापूस या दोन वाणातील आंब्यांचे उत्पन्न घेत असतात. खराब हवामानामुळे आंब्याचा मोहर गळून, करपून जाऊ नये यासाठी येथील शेतकरी विशेष मेहनत घेऊन महागड्या औषधांची फवारणी करत असतात. या वर्षी आंब्याचे उत्पादन चांगले आलेले असतांनाच अचानक आलेल्या या तोक्ते चक्री वादळाचा फटका आंबा पिकाला बसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाडावरुन आंबे काढणीला अजून १० ते १५ दिवस बाकी असताना या वादळी वाऱ्याने झाडावरील निम्मे आंबे गळून पडले. गळून पडलेले आंबे फुटले गेल्याने त्याचा उपयोग होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

उत्पादकांच्या आशेवर पाणी

डहाणू तालुक्यात सुमारे शंभर एकर क्षेत्रावर शेडनेटमध्ये ढोबळी व हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. मिरची व भाजीपाला उत्पादन सध्या अंतिम टप्प्यात असल्याने ५० ते ६० टक्के शेतकऱ्याने आपले शेडनेट काढून गुंडाळून ठेवले होते. तरी उर्वरित शेतकऱ्यांचे वादळी वातावरणामुळे नुकसान झाल्याचे माहिती पुढे आली आहे. करोना निर्बंधामुळे बंद असलेल्या हॉटेल व्यवसायाचा मिरची उत्पादकांना फटका बसला आहे. मे महिन्याच्या अखेरीस इतर भागातून येणाऱ्या मिरचीचा आवक कमी होत असल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला व मिरची उत्पादनाला चांगले दर मिळत असतात. मात्र यंदा वादळी पावसामुळे मिरची व भाजीपाला उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.