सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वैद्यकीय अधीक्षकांना कळवूनही बोईसरमध्ये रुग्णसेवा सुरुच

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक असून ती वापरायोग्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने वैद्यकीय अधीक्षकांना कळविले आहे. तरीही या रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीतून रुग्णसेवा दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या रुग्णालयातून बारुग्ण विभागात सुमारे २५० रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात. याचबरोबरीने रुग्णालयामध्ये प्रसूती कक्ष, लसीकरण विभाग, अपघात विभाग, बारुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग आजही याच धोकादायक इमारतीत सुरू आहेत. हे रुग्णालय बारा खाटांचे असून नेहमी या खाटा रुग्णांनी भरलेल्या असतात. याचबरोबरीने आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयांमध्ये तीन डॉक्टर व तत्सम सेवेसाठी १५ कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णालयाच्या या इमारतीमध्ये प्रयोगशाळा, औषध भांडार असे विविध विभाग आजही धोकादायक परिस्थितीत असून रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सुरू ठेवले आहेत. त्यातच ही संपूर्ण इमारत गळकी असून ती जीर्ण झाली आहे.

रुग्णालय इमारतीचे बांधकाम ७४ वर्षांपूर्वी म्हणजे १९४६ मध्ये पूर्ण झालेले असून ही इमारत दगडी पायाची आहे. सामाजिक भावनेतून आरोग्य विभागाला दायित्व म्हणून हे आरोग्य मंदिर नाव असलेली इमारत एका दानशुराने सुपूर्द केली होती.

इमारतीचे आयुर्मान ७४ वर्षे झाल्याने ती जीर्ण झाली असून वापरालायक नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने म्हटले आहे. त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली असून या इमारतीमधून कोणत्याही प्रकारचे कामकाज करू नये अशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही रुग्णांची मागणी पाहता ते सुरूच आहे.

अलीकडेच हे रुग्णालय टीमा रुग्णालयात स्थलांतर करण्याचा विचार सुरू होता. मात्र त्यादरम्यान करोना संक्रमणाची परिस्थिती उद्भवल्याने हे स्थलांतर थांबले, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. आजही या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण तपासणी व तत्सम रुग्णसेवा सुविधा सुरू असून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असे आरोप नागरिक करीत आहेत. धोकादायक इमारतींमध्ये रुग्णसेवा देऊ नये व हे रुग्णालय इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलणे अपेक्षित असल्याचेही नागरिक सांगत आहेत.

स्थिती काय

* इमारत जीर्ण झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी या इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने या इमारतीची व रुग्णालयाची पाहणी केली. यामध्ये ही इमारत दगडी पायाची असल्याने या इमारतीचा पाया काही ठिकाणी खचला असल्याचे दिसून आले.

* इमारतीच्या अध्र्या भागावर लाकडी माळ्याचा पहिला मजला असून त्यावर कौलारू छत आहे. तसेच उजव्या भागांमध्ये सिमेंट पत्र्याची तळमजली इमारत आहे. इमारतीची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने ती वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने वैद्यकीय अधीक्षक यांना दिला आहे.

* याचबरोबरीने या इमारतीमधील बारुग्ण विभागातील सभागृहातील लाकडी तुळईमध्ये तडा गेलेला असून त्या ठिकाणी लोखंडी बीमचा टेकू देण्यात आलेला आहे.

* पहिल्या मजल्यावरील पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे लाकडी मजला कमकुवत झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने नोंद केली असून ही इमारत कमकुवत झाल्याचेही म्हटले आहे.

बोईसर येथील प्रस्तावित नवीन रुग्णालयाच्या जागेची बाब न्यायप्रविष्ट आहे. हे रुग्णालय पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्यासाठीची प्रक्रिया व कार्यवाही सुरू आहे.

– डॉ. राजेंद्र केळकर, वैद्यकीय अधीक्षक